एकाचा पुरात वाहून तर शेतकऱ्यासह दोन जणांचा बुडून मृत्यू
By Admin | Published: June 8, 2017 11:46 PM2017-06-08T23:46:32+5:302017-06-08T23:46:32+5:30
जिल्ह्यात दोन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांना प्राण गमावावे लागले. बुधवारी झालेल्या पावसामुळे एक जण पुरात
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 8 - जिल्ह्यात दोन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांना प्राण गमावावे लागले. बुधवारी झालेल्या पावसामुळे एक जण पुरात वाहून गेला तर गुरुवारी एका शेतकऱ्यासह दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे डोहात पाय घसरल्याने एक बालक बेपत्ता आहे.
तुषार गुलाबराव न्हावी (२७, रा. चहार्डी ता. चोपडा), दीपक राजाराम निकम (२९, रा.शेंदुर्णी ता. जामनेर), समाधान कडुबा सुरवाडे ( ४०, रा. जळांद्री ता. जामनेर) अशी या मृतांची नावे आहेत.
चहार्डी येथील काळकमपूरा भागातील तुषार न्हावी हा बुधवारी रात्री केश कर्तनाचा व्यावसाय आटोपून रात्री घरी जात होता. चंपावती नदी पार करत असतांना नदीला आलेल्या पुरात तो वाहून गेला. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.
दीपक निकम हा गुरुवारी मित्रांसह गोंदेगाव ता. जामनेर येथे धरणात पोहण्यासाठी गेला होता. तिथे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
जळांद्री येथील शेतकरी समाधान सुरवाडे यांचा मृतदेह गुरूवारी दुपारी कांग नदीपात्रात आढळून आला. कांग प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
ओझर ता. चाळीसगाव येथील तितूर नदीपात्राजवळ असलेल्या नाग डोहात राहुल जिभाऊ बागूल ( ९, रा.इंदिरानगर ओझर, ता. चाळीसगाव) हा बालक पाय घसरुन पडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. त्याचा रात्रीपर्यंत शोध लागलेला नव्हता.