पीओपी मूर्तींवर बंदी आल्यास, लाखो कारागीर बेरोजगार होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:16 AM2021-01-21T04:16:07+5:302021-01-21T04:16:07+5:30
जळगाव जिल्हा मूर्तिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये ...
जळगाव जिल्हा मूर्तिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, औरंगाबाद, पेण, सिंधदुर्ग या भागातील मूर्ती व्यावसायिक सहभागी झाले होते. `गणपती बाप्पा मोरया` पीओपी वरील बंद उठवा, अशा घोषणा देऊन सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. टॉवर चौक, नेहरू चौक, नवीन बस स्थानक व स्वातंत्र्य चौक मार्गे हा मोर्चा दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात विविध ठिकाणाहून महिला व पुरूषांसह ५०० ते ६०० कारागीर बांधव सहभागी झाले होते. डोक्यावर मूर्तीकार असलेली टोपी आणि हातात भगवा झेंडा घेऊन, या कारागिरांनी पीओपीवर बंदीचा निर्णय कायम स्वरूपी मागे घेण्याची मागणी केली. यावेळी कुठलाही गैरप्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी मोर्चातील पाच जणांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देऊन, उप जिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांना निवेदन देण्यात आले.
इन्फो :
तर लाखो कारागीर बेरोजगार होणार :
दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्र व इतर सण-उत्सवांमध्ये मूर्ती व्यावसायिक प्लॅस्टर ऑफ पॅरीसपासूनच मूर्ती तयार करतात. पीओपीपासून तयार होणारी मूर्ती टिकाऊ आणि खर्चही कमी येत असल्यामुळे नागरिकानांही योग्य किंमतीत देता येते. तसेच नदीत विसर्जन केल्यानंतर दोन दिवसांत या मूर्ती पूर्णपणे विरघळून जातात. तसेच या मूर्तींपासून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. असे असतांना केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नव्या जाचक अटींमुळे पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याबाबत सरकार निर्णय घेत आहे. राज्यात सध्या मूर्तिकारांचे साडेतीन लाख कारखाने असून, या माध्यमातून २० ते २५ लाख मूर्ती कारागीर पोट भरत आहेत. जर सरकारने पीओपी मूर्तींवर बंदी आणली तर लाखो कारागीर बेकार होतील आहेत, कारण शाडूच्या मूर्ती बनविणे शक्य नसून, त्या मूर्तींमुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने ही पीओपी वरील बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा मूर्ती कारागीर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची माहिती श्री गणेश मूर्तिकार प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रवीण बावधनकर, कैलास पाटील, राजेंद्र पाटील `लोकमत`शी बोलतांना दिली.