कचऱ्याच्या धुराची समस्या कायम राहिली तर घरं विक्री काढण्याशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:23+5:302021-06-18T04:12:23+5:30
पवार पार्क,चंदू अण्णा नगर परिसरातील नागरिकांच्या व्यथा : बंद घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...
पवार पार्क,चंदू अण्णा नगर परिसरातील नागरिकांच्या व्यथा : बंद घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील आव्हाणे शिवारात गेल्या ८ वर्षांपासून बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पातून निघणाऱ्या कचऱ्याचा धुरामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील चंदू अण्णा नगर, पवार पार्क, निमखेडी परिसर, खोटे नगर परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, हीच समस्या अशाच प्रकारे कायम राहणार असली तर या भागातून घरं विक्री करून पलायन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
मनपा प्रशासनाला अजूनही बंद घनकचरा प्रकल्प सुरु करता आलेला नाही. याठिकाणी पडलेल्या सुमारे १ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर अजूनही प्रक्रिया झालेली नसल्याने, रासायनिक प्रक्रियेमुळे या कचऱ्याला आग लागत आहे. तसेच अनेकवेळा मनपा कर्मचारी या कचऱ्याला आग लावतात. अनेक वर्षांपासून हा कचरा जळत असून, जळणाऱ्या कचऱ्यातून निघणाऱ्या धुरामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.
२४ तास घराचा दरवाजा ठेवावा लागतो बंद
दिवस असो वा रात्र २४ तास या भागात धूर पसरत असतो, त्यामुळे घराचा दरवाजा बंद ठेवावा लागत असल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली. त्यात पाऊस झाला तर रस्ते नसल्याने या भागात चिखल पसरतो, तर पाऊस नसला तर सकाळी वाहने वापरत असल्याने रस्त्यावरची सर्व धूळ घरांमध्ये जाते. तर रात्रीच्या वेळेस घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे निघणारा धूर घरांमध्ये जातो. यामुळे घरात थांबणेही कठीण झाले आहे. मनपाकडून रस्त्याचीही दुरुस्ती केली जात नाही. दुसरीकडे धुराबाबत देखील कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली. स्थानिक नगरसेवक व मनपा प्रशासनाकडे तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्याचेही रहिवाशांनी सांगितले.
घर विक्री करून गावाकडे परतावे लागेल
काही वर्षांपूर्वी शहरापासून दूर व शांतता असलेला परिसर असल्याने या भागात घर घेतले. मात्र, घर घेतल्यापासून असा एक दिवस नाही गेला की त्या दिवशी धुरापासून आम्हाला त्रास झाला नाही. कोणताही सण असो वा कार्यक्रम अशा परिस्थितीत देखील आम्हाला घर बंद ठेवावे लागते अशी माहिती सुरेखा पाटील या गृहिणीने दिली. या भागात घर घेतल्यानंतर ही समस्या दररोज सहन करावी लागत आहे. आता ही समस्या जर कायम राहिली तर या भागातील सर्वांना ही घरं विक्री करून इतरत्र किंवा पुन्हा गावांमध्ये स्थायिक व्हावे लागेल असा संताप जुई पाटील यांनी व्यक्त केला.
तक्रारी, निवेदन देऊन, आंदोलन करुन थकलो
या भागातील समस्यांबाबत स्थानिक नगरसेवकांकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मनपा प्रशासन, महापौर, उपमहापौर, आमदार यांच्यासह पर्यावरणवादी संघटनांना निवेदन देण्यात आले. कोणीच ऐकून घेत नाही. म्हणून कुटुंबीयांसह रस्त्यावर उतरून आंदोलन देखील केले. मात्र, कोणत्याही प्रकारचे लक्ष मनपा प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी देखील द्यायला तयार नाहीत. सर्वांनी या भागातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले असून, कोणालाही आमच्या समस्यांशी घेणे-देणे नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
कोट..
गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्याचा धुरामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. धुरामुळे घराबाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. अनेकदा घरातच धुरामुळे श्वास घ्यायला देखील त्रास होत असतो.
- योगेश पाटील, रहिवासी, पवार पार्क
नागरिक आता कोरोना आला म्हणून मास्क लावत आहेत. मात्र, आमच्या पवार पार्क मधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मास्क घालत आहे. कारण, मास्क नाही घातला तर विषारी धुरामुळे आमचे जगणे कठीण होऊन जाईल.
-भूषण जाधव, रहिवासी, चंदू अण्णा नगर परिसर