वनजमिन विक्री प्रकरणात गरज पडल्यास स्वत: फिर्याद देऊ- आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:38 PM2018-11-15T22:38:10+5:302018-11-15T22:38:53+5:30
विधानसभेतही उपस्थित करणार विषय
जळगाव: वनजमीनीची परस्पर बनावट सातबाराच्या आधारे विक्री केल्याच्या प्रकरणात प्रशासन फिर्याद देणार आहे. त्यांनी तक्रार न दिल्यास स्वत: तक्रार देऊ, अशी माहिती आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवार व परिसरातील वनविभागाच्या जमिनींची परस्पर विक्री केल्याचे प्रकार घडले असून आतापर्यंत सुमारे २२८८ एकर जमिनची अशाप्रकारे विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. शेकडो कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आमदार प्रा.चंद्रकांत स ोनवणे यांनी रविवार, ७ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. याबाबतचे निवेदन सोमवार, ८ आॅक्टोबर रोजी जळगाव दौºयावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनाही सादर केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. त्या अहवालात काय शिफारस केली जाते? जिल्हाधिकारी काय आदेश देतात? यानंतर या विषयी विधानसभेत हा मुद्दा उचलू. प्रशासन याबाबत तक्रार करणार असल्याचे समजले. त्यांनी तक्रार दिली नाही तर मी स्वत: तक्रार देईल, असे आमदार सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आमदार सोनवणे म्हणाले की, वनजमिनीची खरेदी-विक्री झाली आहे. त्याचे खरेदी खतच प्रशासनाच्या हाती लागले आहेत. त्यामुळे लोकांना फसविण्याचा उद्देश होता, हे स्पष्ट आहे. त्यानुसार व्यवहारही झाले आहेत त्यामुळे हा मुद्दा विधानसभेत उचलला जाईल.