जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर अफवा पसरविल्यास थेट कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 04:15 PM2018-04-12T16:15:36+5:302018-04-12T16:15:36+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी पोलीस व जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवेमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याच्या यापूर्वी घटना घडल्या आहेत. त्यामुळे या उत्सवात फेसबुक, व्हाट्सअॅप व व्टीटर या सारख्या सोशल मीडियावर कोणी अफवा पसरविली तर त्या व्यक्तीची थेट पोलीस कोठडीतच रवानगी केली जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी पोलीस व जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवेमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याच्या यापूर्वी घटना घडल्या आहेत. त्यामुळे या उत्सवात फेसबुक, व्हाट्सअॅप व व्टीटर या सारख्या सोशल मीडियावर कोणी अफवा पसरविली तर त्या व्यक्तीची थेट पोलीस कोठडीतच रवानगी केली जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तरित्या जिल्ह्यातील सर्व विभागाच्या प्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाने काय खबरदारी घ्यावी याच्या सूचना दिल्या आहेत. महावितरण, अग्निशमन दल, आपत्ती कक्ष यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात ६२२ मिरवणुका
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ ते ३० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात ६२२ मिरवणुका निघणार आहेत. त्यापैकी ४३३ मिरवणुका या १४ एप्रिल रोजीच निघणार आहेत. त्यात रॅली १३, भीमगीत व अन्य कार्यक्रम ५, पुतळा पूजन १०३ व प्रतिमा पूजन १९४ असे कार्यक्रम होणार आहेत. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी गुंड, गुन्हेगार, उपद्रवी व्यक्ती तसेच अवैध धंदे चालक यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यात सीआरपीसी १०७ प्रमाणे ३१७, ११० प्रमाणे ३९, १४९ प्रमाणे ३०६ व १४२/२ प्रमाणे ७६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
संवेदनशील भागावर अधिक लक्ष
जिल्ह्यातील संवेदनशील भागावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक यांनी स्वत: जावून बैठका घेतल्या आहेत. याशिवाय स्ट्रायकिंग फोर्स १७, आरसीपी प्लाटून ८ व एआरटी प्लाटून ८ या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. प्रत्येक उपअधीक्षकासोबत एक आरसीपी प्लाटून असणार आहे.
आक्षेपार्ह मजकूर डिलीट करा
उत्सवाच्या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आला तर त्याला तत्काळ डिलीट करा किंवा पोलिसांना त्याची माहिती द्या. जी व्यक्ती असा मजकूर,फोटो, क्लीप, आॅडीओ, व्हीडीओ प्रसारीत करेल किंवा लाईक,कमेंटस् व शेअर करेल त्या व्यक्तीविरुध्द भारतीय दंड संहिता कलम व माहिती तंत्रज्ञाद कायदा २००८ नुसार दखलपात्र गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा कराळे यांनी दिला आहे.