फेलोशिप देणार नाही, तर संशोधन होणार कसे?
By अमित महाबळ | Published: March 21, 2023 06:04 PM2023-03-21T18:04:11+5:302023-03-21T18:13:54+5:30
जळगाव जिल्ह्यातून एका विद्यार्थिनीने प्रस्ताव पाठवूनही महाज्योतीकडून संशोधनासाठी फेलोशिप मिळत नसल्याचा प्रकार उघड झाला आहे.
जळगाव : भारतीय इतिहास, साहित्य, संस्कृती, विज्ञान आदी विषयांतील संशोधनाला चालना मिळावी म्हणून सरकार प्रोत्साहित करत असले तरी संशोधकांच्या मार्गातील अडथळे कमी नाहीत. जळगाव जिल्ह्यातून एका विद्यार्थिनीने प्रस्ताव पाठवूनही महाज्योतीकडून संशोधनासाठी फेलोशिप मिळत नसल्याचा प्रकार उघड झाला आहे.
प्रीती राजेंद्र दातेराव (प्रीती शुक्ल) यांनी संस्कृत भाषेतील संशोधनासाठी फेलोशिप (वर्ष २०२२-२३) मिळावी म्हणून महाज्योतीकडे अर्ज केला. सप्टेंबर २०२२ मध्ये कागदपत्रांची पडताळणी महाज्योतीच्या कार्यालयात झाली. २ नोव्हेंबर २०२२ रोजी, अपात्र अर्जदारांची तात्पुरती यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. त्यामध्ये दातेराव यांच्या नावापुढे १ जानेवारी २०२१ पूर्वीची नोंदणी असल्याचे कारण देण्यात आले होते.
विद्यापीठाचे महाज्योतीला पत्र -
- हे प्रकरण विद्यापीठात आल्यावर उपकुलसचिव (संशोधन) वि. व. तळेले यांनी महाज्योतीला पत्र पाठवले. पीएच.डी.साठी अर्जदाराचा तात्पुरता प्रवेश दि. ३ नोव्हेंबर २०२० असला तरी आरआरसी ३० ऑगस्ट २०२१ रोजी, झाली आहे.
- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नियमावलीनुसार पीएच.डी. अभ्यासक्रमास तात्पुरत्या प्रवेशित विद्यार्थ्यांना एका सत्राचा प्री. पीएच.डी. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर व संशोधन मान्यता समितीसमोर (आरआरसी) सादरीकरण केल्यानंतर समितीच्या सभेचा दिनांक हा विद्यार्थ्याच्या पीएच.डी. अभ्यासक्रमाचा प्रवेश कायम झाल्याचा दिनांक समजला जातो, असे पत्रात म्हटले आहे.
महाज्योतीकडून प्रतिसादाची प्रतीक्षा -
विद्यापीठाच्या पत्रानुसार ३० ऑगस्ट २०२१ रोजीची मान्यता गृहीत धरून २०२२-२३ साठी पीएच.डी. फेलोशिप मंजूर करावी, अशी विनंती दातेराव यांनी महाज्योतीकडे केली. मात्र, त्यांना अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
अर्जदार म्हणतात... -
फेलोशिपचे अर्ज २०२२-२३ या वर्षासाठी मागविण्यात आले होते. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी फेलोशिपची रक्कम मिळावी. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विहीत मुदतीत अर्ज व कागदपत्रे सादर केली. त्रुटीवर स्पष्टीकरण देणारे विद्यापीठाचे पत्र महाज्योतीला पाठविले आहे. या सर्वांची दखल घेतली जावी.
- प्रीती राजेंद्र दातेराव (प्रीती शुक्ल), अर्जदार