पोरगं आजारी पडलं तर न्यायला गाडीच नाही! ‘रेट’मुळे ७०० वाहनांची सेवा रखडली; इंधनदरवाढीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 11:00 AM2023-10-12T11:00:08+5:302023-10-12T11:01:34+5:30
२०१९ मध्ये नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था व महाराष्ट्र विकास समूहाला वाहन पुरविण्याचा ठेका देण्यात आला होता.
कुंदन पाटील -
जळगाव : २२ जिल्ह्यांतील अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची सेवा बंद पडली असून त्यामुळे पोरगं आजारी जरी पडलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी नेण्यासाठई न्यायला सरकारी वाहनच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
२०१९ मध्ये नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था व महाराष्ट्र विकास समूहाला वाहन पुरविण्याचा ठेका देण्यात आला होता. या दोन्ही समूहांनी राज्यातील २२ जिल्ह्यात सुमारे ७०० वाहने पुरविण्यासाठी तयारी दाखविली होती. त्यावेळी इंधनाचा दर ६५ रुपयांवर असताना वर्षभरासाठी या दोन्ही समूहांना कंत्राट दिला गेला. २०२० व २०२१ मध्ये कुठलेही दर न वाढवता ‘वाहन सेवा’ सुरूच ठेवण्याचे शासनाने निर्देश दिले. तीन वर्षात इंधनाचे दर शंभरीवर भिडले. राज्य शासन मात्र दर वाढवून देण्यासाठी सातत्याने चालढकल करत गेले. त्यामुळे कंत्राटदारांनी दि. १ जून २०२३ पासून ‘वाहन सेवा’ थांबविली.
निविदेलाही ‘ठेंगा’
राज्य शासनाने काही जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दरानुसार वाहनांसाठी निविदा मागविल्या. मात्र दर परवडणारे नसल्याने निविदेकडे सर्वांनीच पाठ फिरविली.
२२ जिल्ह्यात कोंडी
सिंधुदुर्ग,सांगली, सातारा, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, जालना, जळगाव, नंदुरबार, धुळे, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक व छत्रपती संभाजीनगर.
इंधनाचे दरवाढीनंतर राज्य शासनाला १० वेळा पत्र पाठविले. दरवाढीसंदर्भात मागणीही केली. मात्र दाद न दिल्याने शेवटी नाइलाजास्तव वाहनांचा पुरवठा बंद करावा लागला.
- संदीप देवरे-पाटील, छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था, नाशिक.