१५० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आल्यास शाळा बंद ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:30 AM2021-02-21T04:30:37+5:302021-02-21T04:30:37+5:30
जळगाव : आठवडाभरापासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरूवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचे १०० ते १५० च्या वर रूग्ण ...
जळगाव : आठवडाभरापासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरूवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचे १०० ते १५० च्या वर रूग्ण आढळून येत आहेत. शनिवारी जिल्ह्यात १५० च्या वर रूग्ण आढळून आले, तर सोमवार पासून इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवा, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी शनिवारी सुप्रिम काॅलनीतील कार्यक्रमात दिली.
शहरासह जिल्ह्यात नागरिकांकडून कुठलीही खबरदारी घेण्यात येत नसल्यामुळे कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढत आहे. गेल्या आठवडापासून दररोज १०० ते १५० रूग्ण आढळून येत आहेत. रूग्णवाढीचे असेच प्रमाण दररोज राहिले तर कठोर उपाययोजना करणे गरजेचे असून, याबाबत आपण प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सुचना केल्या असल्याचेही पालक मंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रमाणे रूग्ण संख्या वाढत असून, ही चिंतेची बाब आहे. जर नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टसिंगचा वापर केला नाही, तर परिस्थिती जास्त बिकट होऊ शकते. जे नागरिक मास्कचा वापर करणार नाही त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करण्याबाबत सुचनाही देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.