नियमबाह्य काम असेल तर वॉटरग्रेसचा मक्ता रद्द करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:10+5:302020-12-08T04:13:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वॉटरग्रेस कंपनीकडून जर शहराच्या स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसेल व दिलेले काम नियमबाह्य असेल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वॉटरग्रेस कंपनीकडून जर शहराच्या स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसेल व दिलेले काम नियमबाह्य असेल तर वॉटरग्रेसचा ठेका रद्द केला जावा, अशी भूमिका शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी घेतली आहे. तसेच हा मक्ता देण्यामागे मनपातील सत्ताधारी व मनपा प्रशासन यांची मिली भगत असल्याचा आरोप अनंत जोशी यांनी केला आहे.
अनंत जोशी यांनी सोमवारी मनपातील विरोधी पक्ष नेत्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूूमिका जाहीर केली. फेब्रुवारी महिन्यात शिवसेनेने वॉटरग्रेसच्या कामाविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर हे काम मनपाने थांबविले. त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे आंदोलने करता आली नाहीत. तसेच कायद्याच्या अडचणींमुळे मनपाने पुन्हा वॉटरग्रेसला संधी दिली. आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आंदोलने करणे शक्य नव्हते. मात्र, वॉटरग्रेसबाबत शिवसेना गप्प का?, शिवसेनेचा पाठिंबा आहे का, अशा ज्या चर्चा आहेत, त्या चर्चांमध्ये तथ्य नसून, शिवसेना आजही वॉटरग्रेसकडून शहरात सुरू असलेल्या कामांबाबत समाधानी नसल्याचे जोशी यांनी सांगितले.
सोशल मीडियावर दिल्या गेल्या धमक्या
लॉकडाऊनच्या काळातही सोशल मीडियावर शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर मुद्दे उपस्थित केले होते. मात्र, त्यावेळी अनेकांनी मला धमक्या दिल्या असल्याचा गौप्यस्फोट अनंत जोशी यांनी केला. तसेच काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनीदेखील माझ्या विरोधाबाबत शंका उपस्थित केली. त्यामुळे मधल्या काळात मी दूर झालो असल्याचीही माहिती जोशी यांनी दिली.
सत्ताधारी व प्रशासन यांची मिली भगत
वॉटरग्रेसमध्ये मनपातील सत्ताधारी व प्रशासन दिशाभूल करत असून, त्यांची यामध्ये मिली भगत असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे.
पाकिटे घेणाऱ्यांमध्ये मी नाही. वॉटरग्रेसकडून पाकिटे घेतली जात असल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे. यामध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक नसून, यामध्ये कोणताही शिवसेनेचा नगरसेवक आढळला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही जोशी यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत असले उद्योग मी कधीही केले नसून, यामध्ये माझा कोणताही संबंध नसल्याचे जोशी यांनी सांगितले.
----