झाडांचे संगोपन केल्यास घरपट्टी माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 09:22 PM2019-07-01T21:22:47+5:302019-07-01T21:23:14+5:30
वसंतनगर ग्रामपंचायतीचा उपक्रम : ‘एक घर एक झाड’, ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद
अमळनेर : पारोळा : वसंतनगर, ता.पारोळा येथे ग्रामपंचायतीमार्फत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘एक घर, एक झाड’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. जे कुटुंब वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करेल त्याला वार्षिक कर म्हणजे घरपट्टी व पाणीपट्टी माफ केली जाईल, अशी घोषणा पंचायत समिती माजी सभापती प्रकाश जाधव व गावचे सरपंच अविनाश जाधव यांनी केली.
वसंतराव नाईक यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त सदर उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक कुटुंबात एक झाड देण्यात आले. प्रत्येकाने ते शेतात किंवा घराच्या परिसरात लावून त्याचे संगोपन करावयाचे आहे. वर्षभरात ज्यांनी झाडे जगविली अशा कुटुंबांना वर्षभरातील घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात येणार आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुमारे एक हजार १८७ झाडे ग्रामपंचायतीकडून वाटप करण्यात येणार आहेत.
यावेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सभापती प्रकाश देशमुख जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच अविनाश जाधव, अजमल जाधव, गणेश जाधव, आवेराम जाधव, ताराचंद जाधव, गोरख जाधव, राजाराम जाधव, संतोष जाधव, शालिक जाधव, अनार जाधव, दीपक जाधव, एकनाथ जाधव, स्रोहिदास जाधव, सरीचंद जाधव, श्याम जाधव, रमेश जाधव, विलास जाधव, मनोज जाधव, हिरा जाधव, हुकूम जाधव, साहेबराव जाधव, दरबार जाधव, बाळू जाधव, मधुकर जाधव, जगन जाधव, मोकम जाधव, विठ्ठल जाधव, सुभाष जाधव, आलम जाधव, मोती जाधव, बाबूलाल जाधव आदी उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांपासून पावसाचे कमी होत असलेले प्रमाण चिंताजनक आहे. झाडे जगली तर पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊन पर्जन्यमानातही बदल जाणवेल. त्यामुळे झाडे नुसती लावून उपयोग नाही तर ती जगविली पहिजेत. या उद्देशाने हा उपक्रम राबवीत आहोत, असे सरपंच, ग्रामस्थांनी सांगितले.