जळगावला आले म्हणजे भरीत-भाकरीच्या मेनूचा मोह होणारच...
By विलास.बारी | Published: November 27, 2017 06:02 PM2017-11-27T18:02:36+5:302017-11-27T18:21:45+5:30
जळगाव जिल्ह्यात हिवाळ्यात होते सर्वत्र भरीत पार्टीचे आयोजन
आॅनलाईन लोकमत
जळगाव : दि.२७ : सोनं आणि केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात तुम्ही हिवाळ्यात पर्यटन किंवा कामाच्या निमित्ताने आलात तर कळण्याची भाकरी आणि भरीताचे रुचकर जेवण घेण्याचा मोह तुम्ही आवरू शकणार नाही. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत जळगावात शेतात सर्वत्र भरीत पार्टीची धूम असते. थेट पुणे, मुंबई व इंदूरपर्यंत पोहोचणाºया भरीताच्या वांग्यांमुळे जळगावातील अनेक गावांचे अर्थकारण बदलले आहे.
बामणोदची वांगी भरीतासाठी प्रसिद्ध
जळगावात भरीतासाठी वांगी बामणोदच्या शेतात पिकलेली निवडली जातात. बामणोद हे भुसावळ-यावल रस्त्यावरीले एक छोटेसे गाव आहे. या ठिकाणावरून वांगी मोठ्या प्रमाणात थेट मुंबई-पुण्याला रवाना केली जातात. स्थानिक बाजारात ४० रुपये किलो दराने मिळणारी ही वांगी, मुंबई-पुण्यात ६० ते ८० रुपये किलो दराने विकली जातात. वाग्यांमुळे या लहानशा गावाचे अर्थकारणही बदलत चालले आहे. जळगाव जिल्ह्यातील तापीकाठावरचे सर्वच तालुके ही वांगी पिकवतात. विदर्भातल्या थेट मलकापूरपर्यंत ही वांगी आता सहज उपलब्ध होताना दिसतात.
कपाशीच्या काड्यांवर भाजलेल्या वांग्यांची चवच न्यारी...
भरतासाठी वांगी भाजावी लागतात. पण हेच वांगी कापसाच्या काड्यांवर भाजले तर त्या भरीताला खरी चव येते. भाजण्यापूर्वी वांग्यांना स्वच्छ काट्याने छिद्रे पाडून घ्यावे. काड्यांच्या आगीत १५ ते २० मिनिटांत वांगी भाजली जातात. भाजलेली वांगी एका मोठ्या परातीत ठेवून त्यांचे काळे झालेले साल काढायचे. चांगल्या दर्जाच्या वांग्यांना भाजल्यानंतर भरपूर तेल सुटते.
ठेचा, कांद्याची पात यामुळे भरीत होते रुचकर
साल आणि देठ काढलेला वांग्यांचा गर एका लाकडी (बडगी) भांड्यात टाकला जातो. हा गर लाकडाच्याच मुसळासारख्या वस्तूने ठेचला जातो. त्यामुळे तो गर एकजीव होतो. ठेचून एकजीव झालेल्या वांग्याच्या गराला फोडणी दिली जाते. फोडणीत तिखटाऐवजी भाजलेल्या मिरचीचा ठेचा टाकला जातो. त्यासाठी तिखट लवंगी मिरची वापरली जाते. तिखट असलेले भरीत थंडीत रुचकर लागते. कांद्याची पात भरतासाठी अत्यावश्यक असते. हिरवी पात चिरून तिही भरीतात टाकली जाते. त्या पातीचे कांदे जेवतांना खातात. खोबरे, शेंगदाणे हे फोडणीच्या वेळी तर ठेचलेला लसूण फोडणी दिल्यानंतर भरीतात टाकली जाते.
कळण्याची भाकरी व पुरीमुळे भरीताला स्वाद
खान्देशात भरीताबरोबर कळण्याची भाकरी किंवा पुरी केली जाते. (कळणे म्हणजे ज्वारी आणि उडीद यांचे मिश्रण करून तयार केलेले पीठ). साधारण १ किलो ज्वारीत २०० ते २५० ग्रॅम उडीद टाकल्यानंतर कळणे तयार होते. सोबतीला तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोशिंबीर, मुळा व टोमॅटो या मेणूची लज्जत वाढवितो.
भरीताचा मेणू पुण्या-मुंबईपर्यंत
जळगाव तालुक्यातील आसोदा या गावातील आचारी भरीत तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या गावातील काही तरुणांनी जळगाव शहरात भरीत सेंटर सुरु केले आहेत. या ठिकाणचे भरीत पुणे, मुंबई, इंदौरपर्यंत पोहचविले जाते.
भरीताची वांगी केवळ जळगावातच
जळगाव जिल्ह्यात पिकणाºया या वांग्यांची लागवड अन्य ठिकाणी होत नाही. त्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला तर जळगावच्या भरीतचा चव देखील येत नाही. या जातीवर संकर करण्याचा प्रयत्नही झाला आहे; पण संकरित वांग्यांमध्ये ती चव आली नाही.