महापालिकेत प्रवेश पाहिजे तर मग कोरोना टेस्ट होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:21 AM2021-04-30T04:21:11+5:302021-04-30T04:21:11+5:30
खबरदारी म्हणून मनपा प्रशासनाचा निर्णय; लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात कडक निर्बंध लागू ...
खबरदारी म्हणून मनपा प्रशासनाचा निर्णय;
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जळगाव शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट केली जात आहे. आता महापालिकेत येणाऱ्या नागरिकांचीदेखील अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. महापालिकेत अत्यावश्यक काम असेल तरच सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. मात्र तरीही खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाने महापालिकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी प्रात्यक्षिक दिसून आले. यामध्ये काही मनपा कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात आली, यासह महापालिकेत येणाऱ्या २० हून अधिक नागरिकांचीदेखील चाचणी करण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नसले तरी यापुढे आता महापालिकेत येणाऱ्यांचीदेखील चाचणी केली जाणार आहे. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. ही तपासणी लॅब टेक्निशियन, सदानंद खैरनार करीत आहेत.
महापालिकेने दिली २० हजार अँटीजन किटची ऑर्डर
महानगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या टेस्टिंगचे प्रमाण वाढविले आहे. शहरातील टेस्टिंग सेंटर वाढविल्याने नागरिकांकडून काेराेनाची चाचणी करून घेतली जात आहे. गेल्या आठवड्यात अँटीजन किट संपण्याच्या मार्गावर असताना दुपारी सहा हजार किट प्राप्त झाले हाेते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा हजार किट प्राप्त झाले हाेते. आगामी काळात किटचा तुटवडा भासू नये यासाठी महापालिकेने २० हजार किटची मागणी नाेंदवली हाेती. चार कंपन्यांनी निविदा दाखल केली हाेती. त्यात पुणे येथील ऑप्ट्राे सिस्टिम्स लिमिटेड या कंपनीचे ४५ रुपये ८ पैसे हे सर्वांत कमी दर असल्याने मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच २० हजार किटचा पुरवठा हाेणार आहे.