रेल्वे स्टेशनवर जायचे तर ५० रुपये प्लॅटफार्म तिकीट काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:15 AM2021-03-07T04:15:01+5:302021-03-07T04:15:01+5:30
जळगाव : गेल्या आठवड्यात मुंबई विभागातील काही रेल्वे स्टेशनवर प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये केल्यानंतर, ११ मार्चपासून भुसावळ विभागातही ...
जळगाव : गेल्या आठवड्यात मुंबई विभागातील काही रेल्वे स्टेशनवर प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये केल्यानंतर, ११ मार्चपासून भुसावळ विभागातही ९ स्टेशनवर प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये मिळणार आहे. यामध्ये जळगाव रेल्वे स्टेशनचाही समावेश आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म तिकीट बंद करण्यात आले होते. मात्र, आता ११ मार्चपासून प्लॅटफार्म तिकीट विक्रीला पुन्हा सुरुवात होणार आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाने पूर्वीप्रमाणे प्लॅटफार्मचे तिकीट १० रुपये न ठेवता थेट ५० रुपये केले आहे. संबंधित प्रवाशाला स्टेशनवर सोडण्यासाठी त्यांचे नातलगही स्टेशनवर येत असल्यामुळे, स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत असते. पूर्वी दोन तासासाठी प्लॅटफार्मचे तिकीट १० रुपये असतांना, एका प्रवाशासोबत साधारणत: दोन ते तीन नातलग सोडण्यासाठी स्टेशनावर यायचे.
मात्र, आता हे तिकीट ५० रुपये केल्यामुळे, नागरिक स्टेशनवर येण्याचे प्रमाण कमी करतील. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सध्या कोरोना काळात हे तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये केले आहे. दरम्यान, रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार १० जूनपर्यंत या तिकिटाचे दर ५० रुपये राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. याबाबतचे आदेश लवकर संबंधित स्टेशन मास्तरांना कळविण्यात येणार असल्याचे भुसावळ जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले. मात्र, रेल्वेच्या या निर्णयाबद्दल प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.