बालकवींची स्मृती शताब्दी वर्षातही उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 05:13 AM2018-05-06T05:13:55+5:302018-05-06T05:13:55+5:30
‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’, ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’... अशा एकाहून एक सरस कविता ज्यांच्या लेखणीतून उमटल्या त्या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती शताब्दी वर्षातही त्यांच्या जन्मस्थळासह स्मृतीस्थळाबाबत उपेक्षा कायम आहे.
जळगाव : ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’, ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’... अशा एकाहून एक सरस कविता ज्यांच्या लेखणीतून उमटल्या त्या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती शताब्दी वर्षातही त्यांच्या जन्मस्थळासह स्मृतीस्थळाबाबत उपेक्षा कायम आहे.
धरणगाव या त्यांच्या जन्मगावी प्रस्तावित असलेले स्मारक मार्गी तर लागलेलेच नाही, शिवाय भादली (ता. जळगाव) रेल्वे स्टेशननजीकचे त्यांचे स्मृतीस्थळही रेल्वे विस्तारीकरणात विस्थापित होण्याच्या मार्गावर आहे. बालकवी ठोंबरे यांच्या निधनास ५ मे २०१८ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाले. ज्या गावात त्यांचे रेल्वे अपघातात निधन झाले त्या जळगाव-भुसावळ दरम्यान भादली या छोट्या स्टेशनवर त्यांचे स्मृतीस्थळ आहे. मात्र दुर्दैव म्हणजे भादली येथील हे स्मृतीस्थळ भुसावळ-जळगाव रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणात हटविण्याच्या हालचाली सुरू आहेत. १९९० मध्ये मध्य रेल्वेच्या पुढाकारानेच हे छोटे स्मृतीस्थळ उभारण्यात आले होते.
हे स्मृतिस्थळ संरक्षित करण्याची मागणी जैन उद्योग समुहाच्या प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुलकर्णी यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याच्याकडे केली आहे. हे स्थळही रेल्वेच्या विस्तारीकरणात हलविले गेले तर १०० वर्षानंतर पुन्हा बालकवींचा मृत्यू होईल, असे किशोर कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. बालकवींचे जन्मगाव धरणगाव येथेही स्मारक प्रस्तावित होते, मात्र तेही मार्गी लागत नसल्याने साहित्यप्रेमींमध्ये नाराजी आहे.