मनपा मालकीच्या जागांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:58 AM2018-05-17T11:58:57+5:302018-05-17T11:58:57+5:30

Ignore the Municipal Names | मनपा मालकीच्या जागांकडे दुर्लक्ष

मनपा मालकीच्या जागांकडे दुर्लक्ष

Next

अजय पाटील
नागरिकांच्या सोई-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नेहमी अर्थिक कर्जाचे रडगाणे सुरु होते. मनपावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामध्ये शहरातील विकास होणे कठीण असल्याचा कांगावा मनपाकडून केला जातो. मात्र, मनपा मालकीच्या कोट्यवधीच्या मालमत्ता मात्र धूळ खात पडल्या आहेत. घरकुल योजनेतील अपूर्णावस्थेत असलेल्या घरकुलांमध्ये मोडतोड करून बांधकाम साहित्याचे चोरीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मात्र याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अजय घेंगट यांनी आयुक्तांनी दिलेल्या पत्रामुळे हा गंभीर प्रकार समोर आला आहे. मनपा मालकीच्या अनेक जागांचे गैरव्यवहार होत असल्याचे या पत्रात म्हटले होते. तसेच या प्रकरणी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता या फाईली गायब झाल्याचे आढळून आल्याचेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराबाबत मनपा प्रशासन कोणतीही वाच्यता करण्याच्या स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मनपाच्या जागांचे गैरव्यहार होत आहेत तर दुसरीकडे कोट्यवधींच्या या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कुठल्याही उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात नसल्याने अनेकवेळा काही जणांकडून या जागेचे ताबा घेण्याचे प्रकारदेखील झाले आहेत. तत्कालीन जळगाव नगरपालिकेने शहरात घरकुल योजना सुरू केली होती. त्यातील अनेक योजनांच्या बांधलेल्या घरकुलांचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. अर्धवट बांधलेल्या या घरकुलांचे सांगडे तसेच पडून आहेत. गेल्या काही वर्षांपासून या मालमत्तांच्या सुरक्षेसाठीदेखील प्रशासनाने कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याने या बांधकामांची मोडतोड करण्यात आली आहे. सम्राट कॉलनी व महादेव मंदिरासमोरील घरकुलांमध्ये अक्षरश: म्हशी बांधण्यात येत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने महापालिकेने राबविलेल्या अपूर्णावस्थेतील घरकुल योजनांच्या जमिनी म्हाडाला देवून त्यातून उत्पन्न मिळविण्याच्या पर्यायाचा विचार प्रशासनाचाहोता. याबाबत महासभेत ठरावदेखील करण्यात आला. म्हाडानेदेखील याबाबत सकारात्मकता दर्शविली. मात्र याबाबतही प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही होत नसल्याने तोही प्रस्ताव रखडला आहे. मनपाच्याच मालकीची असलेली जागा आज धूळ खात पडून असून, याकडे सुस्त प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरात मनपा मालकीच्या सुमारे १०० कोटीच्यावर अधिक भाव असलेल्या मालमत्ता आहेत. या जागांचा उपयोग केल्यास मनपाला आर्थिक फायदा देखील होवू शकतो.

Web Title: Ignore the Municipal Names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव