जळगावातील जिल्हा सामान्य रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:54 PM2018-03-17T22:54:13+5:302018-03-17T22:54:13+5:30
निलंबन काळात कोणतेही काम न करण्याच्या सूचना असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.वर्षा लहाळे यांनी शहरातील एका विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, डॉ.लहाळे यांच्यावर नाशिक येथे याच प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर जळगावला हा दुसरा प्रकार त्यांनी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१७ : निलंबन काळात कोणतेही काम न करण्याच्या सूचना असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.वर्षा लहाळे यांनी शहरातील एका विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, डॉ.लहाळे यांच्यावर नाशिक येथे याच प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर जळगावला हा दुसरा प्रकार त्यांनी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात २७ फेब्रुवारी रोजी शहरातील एक महिला गर्भपातासाठी दाखल झाली होती. या महिलेच्या पोटात १८ आठवड्याचा गर्भ असल्याने स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.रेणुका भंगाळे यांनी गर्भपात करु नये किंवा करायचेच असेल तर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना कागदपत्रांवरच लिहिल्या. त्यानंतर ही महिला खासगी दवाखान्यात गेली. चार दिवसानंतर ही महिला परत जिल्हा रुग्णालयात आली. या महिलेला तीन मुली व एक दहा वर्षाचा मुलगा आहे. मोठी मुलगी अठरा वर्षाची आहे. पाचव्या वेळी गर्भ राहिल्याने गर्भपात करण्यासाठी ती जिल्हा रुग्णालयात आली होती.
कागदपत्रांवर केली खाडाखोड
ही महिला पहिल्यावेळी जिल्हा रुग्णालयात आली त्यानंतर खासगी दवाखान्यात गेली होती. त्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयात आली असता या महिलेच्या कागदपत्रांवर खाडाखोड करुन ‘रिअॅडमिशन’ दाखविण्यात आले आहे. पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गर्भपाताच्या कागदपत्रांवर खाडाखोड करता येत नाही. दरम्यान, २७ फेब्रुवारी रोजीच डॉ.वर्षा लहाळे यांच्या रिपोर्टवरुन खासगी सेंटरमध्ये या महिलेची सोनोग्राफी करण्यात आली आहे.
याच प्रकरणात निलंबन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ.वर्षा लहाळे यांनी नाशिक येथेही बेकायदेशीरपणे गर्भपात केले होते व त्याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्या काही दिवस कोठडीतही होत्या. या प्रकरणात निलंबित झाल्यानंतर त्यांना निलंबन काळात जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नियुक्ती देण्यात आली. तत्कालिन शल्य चिकित्सक डॉ.सुनील भामरे यांच्या काळात डॉ.लहाळे रुजू झाल्या होत्या. निलंबन काळात मुळ काम न करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागुराव चव्हाण यांच्या काळात त्यांनी नियमबाह्य गर्भपाताचे काम केले.