चंद्रपूरला जाणारी अवैध दारु जळगाव स्टेशनवर पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:11 AM2019-07-24T11:11:37+5:302019-07-24T11:25:15+5:30
तरुणाला अटक
जळगाव : राज्य उत्पादन शुल्क व रेल्वे सुरक्षा बलाने मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता रेल्वे स्थानकावर रेल्वे चंद्रपूरला जाणारी अवैध देशी दारु पकडली. गोण्यांमध्ये दारुच्या दीड हजार बाटल्या भरल्या होत्या. मोनू मदन जाट (२३, रा.कंजरवाडा, सिंधी कॉलनी) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूर हा दारुबंदी असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात महाराष्टÑात व मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात अवैध दारु नेली जाते. चेन्नई एक्सप्रेसने जळगाव येथून देशी दारु नेली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव यांनी भरारी पथकाचे निरीक्षक संजय कोल्हे, जवान मुकेश पाटील, नितीन पाटील, नंदू पवार व विठ्ठल हटकर यांचे पथक रेल्वे स्थानकावर पाठविले. रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक जी.एम.घीले, कॉन्स्टेबल प्रमोद सांगळे, रिहाद अहमद व विक्रम वाघ यांच्या पथकाने सापळा रचून प्लॅटफॉर्म क्र. ५ वर मोनू जाट याला पकडले. त्याच्याजवळील गोण्यांची झडती घेतली असता त्यात देशी दारुच्या ९० मिलिच्या दीड हजार बाटल्या होत्या. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोनू याला अटक करुन माल जप्त केला. दरम्यान, गेल्या वर्षी देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव स्थानकावर अवैध दारु व गांजा पकडला होता, तेव्हा देखील आरोपी हे कंजरवाड्यातीलच निष्पन्न झाले होते.