अवैध उत्खनन प्रकरण : खडसेंना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस! मंदाकिनी खडसेही अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 06:30 AM2023-10-19T06:30:54+5:302023-10-19T06:31:10+5:30
दंडाची नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. या धक्कादायक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
- कुंदन पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अवैधरीत्या १ लाख १८ हजार २०२.१५८ ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींवर दंडाची नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. या धक्कादायक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
सातोड (मुक्ताईनगर) येथील एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह सहा जमीनमालकांना मुक्ताईनगर तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी या नोटिसा बजाविल्या आहेत. त्यानुसार अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य २६ कोटी १ लाख १२ हजार ११७ इतके आहे.
यापोटी पाच पटींनी दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. खडसे परिवारातील सदस्यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर. जमिनीची खरेदी करण्यात आली.
गौण खनिजासाठी अवैध उत्खनन करीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
राज्य शासनाने यासाठी एसआयटी स्थापन केली होती. पथकाने सादर केलेला अहवाल सरकारने स्वीकारला आहे. त्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सारे राजकीयदृष्ट्या सुरू आहे. शेतजमिनी आमच्या नावावर असल्या, तरी अवैध गौण खनिजाच्या उत्खननाशी आमचा दुरान्वये संबंध नाही. त्यामुळे योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ.
- एकनाथ खडसे, आमदार