चाळीसगाव तालुक्यातील अंंधारीसह परिसरात अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 02:57 PM2019-03-17T14:57:44+5:302019-03-17T14:59:09+5:30
अवैध वाळू उपसा मन्याड नदीतून रात्री व दिवसा सर्रास सुरू असून, यात संबंधित विभागाचे चांगलेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
अंधारी, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : अवैध वाळू उपसा मन्याड नदीतून रात्री व दिवसा सर्रास सुरू असून, यात संबंधित विभागाचे चांगलेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
मन्याड नदीपासून तमगव्हाण, अंधारी, पिंपळवाड, रोहिणी, हातगाव ही गावे मन्याड नदीच्या अगदी जवळच आल्याने वाळूची वाहतूक ट्रॅक्टरद्वारे जोरात सुरू आहे. मात्र वाळूमाफीयांच्या दिवसातून चार ट्रिपा होतात. एका ट्रिपचे तीन हजार तर चार ट्रिपचे १२ हजार रुपये मिळतात. असे बरेच ट्रॅक्टर केव्हाही भरून जात असताना नजरेस पडत आहेत.
एकीकडे नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, मात्र नदीला वाळूसाठी मोठेमोठे खड्डे पाडले जात आहेत. एवढेच नव्हे तर रात्री, पहाटे वाळूचे ट्रॅक्टर गावाजवळून इतक्या वेगात जातात की, सकाळी प्रसाधन गृहासाठी जाणारी वयोवृद्ध मंडळी व महिलांना या ट्रॅक्टर्सपासून रस्ता सोडून खाली उतरून जावे लागते. तरीही वाळू ट्रॅक्टर हळू चालत नाही. अशा या वाळूमाफियांच्या मागे मोठ्या पुढाऱ्यांचे हात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.