अवैध वाळू उत्खननात ढिगारा कोसळून दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 09:52 PM2020-01-07T21:52:07+5:302020-01-07T21:52:30+5:30
निंभोरासीमची घटना : अन्य दोघे मजूर जखमी
रावेर : तालूक्यातील निंभोरासीम येथील तापी नदीच्या खोऱ्यातील अवैध वाळू वाहतुकीसाठी उत्खनन करतांना निंभोरासीम येथील युवा मजूर दीपक मोहन सवर्णे (वय २२) व नायगाव ता. मुक्ताईनगर येथील सुशांत सोपान मराठे (वय २०) हे सुमारे ४० ते ५० फूट उंचीवरून मातीचा ढिगारा कोसळून जागीच ठार झाले. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेत इतर दोघे जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना निंभोरासीम - मुक्ताईनगर कडे जाणाºया कच्च्या रस्त्यालगत घडली. सदर ढिगारा कोसळताच त्याठिकाणी उपस्थित असलेले गोपीचंद रघुनाथ सपकाळे यांनी आरडाओरड करून लगतच्या मजूर वस्तीतील लोकांना बोलवून ढिगारा उपसला असता समाधान मरू कोळी (वय २१) रा. निंभोरासिम व जितेंद्र कोळी रा. नायगाव (वय २२) हे दोघे जखमी अवस्थेत आढळले. त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, नायगाव येथील मयताच्या आप्तेष्टांनी संबंधित वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टर चालकाकडून आर्थिक मदत मिळाल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भुमिका घेतल्याने तडजोडीअंती दुपारी तीन वाजेच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एन. डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले.