अवैध वाळू वाहतूक; १७ वाहने पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:49 PM2019-08-04T12:49:54+5:302019-08-04T12:50:23+5:30
तीन पथकांची संयुक्त कारवाई
जळगाव : अवैध वाळूच्या विरोधात शनिवारी महसूल,आरटीओ व पोलीस विभागाने तालुक्यातील खेडी शिवारात कारवाईची धडक मोहीम राबविली. त्यात वाळूच्या एका डंपरसह विना नंबर असलेली ट्रॅक्टर व ट्रॉली अशी १७ रिकामी वाहने जप्त केली. दरम्यान, या वाहनांचे चालक व मालक पसार झाले आहेत.
खेडी शिवारातून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी प्रांतधिकारी दीपमाला चौरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण, अप्पर तहसीलदार अभिजित जाधव यांनी खेडी शिवार गाठले. यादरम्यान वाळूचा डंपर गावातील गटारीत अडकलेला होता. इतर काही ट्रॅक्टर गावातच उभी होती. चौरे यांनी तालुका पोलीस स्टेशनचे दिलीप भागवत तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना कळवूनकारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप भागवतयांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह खेडी गाठले. १७ पैकी ३ ट्रॅक्टरसहीत ट्रॉलीवर नंबर नसल्याने ती वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा केली़
तालुक्यातील धानोरा व नागझिरी येथील नदीपात्रात रात्रंदिवस व सर्रास वाळूची वाहतूक केली जाते. अवैध वाळू वाहतूकीसंदर्भात खेडी खुर्द येथील सरपंच माधुरी चौधरी, उपसरंपच सचिन पाटील, गोरखनाथ सोनवणे, विकास पाटील या सदस्यांनी तालुका पोलीसात तक्रर दिली आहे़