कारमधून अवैध तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:17 PM2020-05-05T21:17:03+5:302020-05-05T21:17:31+5:30
पोलिसांची कारवाई : २० लाखाची कार व ४० हजाराच्या मद्यासह एकाला अटक
जळगाव : मद्य विक्रीचे दुकान उघडताच ४० हजार रुपयांची विदेशी दारु घेऊन त्याची २० लाखाच्या अलिशान कारमधून अवैधरित्या वाहतूक करताना सैय्यद मुन्ना सैय्यद बाबुमन्नु (५५, रा.जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी दुपारी इच्छादेवी चौकात पकडले. कार व मद्यसाठा जप्त करण्यात आला असून मद्यविक्री करणारा दुकानदार व ज्याच्याकडे मद्य जात होते, अशा दोघांना आरोपी केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याच पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात लॉकडाऊन काळात अवैध मद्य तस्करी प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात पोलिसांवरच कारवाईची कुºहाड कोसळली. लॉकडाऊनमध्ये शिथीलता येताच पुन्हा अवैध मद्य तस्करीचे प्रकरण घडले.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे यांना चारचाकीतून मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत, निलेश पाटील, सचिन पाटील यांच्या पथकाला सूचना केल्या. माहितीनुसार पथक ईच्छादेवी चौफुलीवर थांबले असता काळ्या रंगाची अलिशान महागडी कार (क्र.एम.एच १९ सी.व्ही.१०) पोलिसांच्या नजरेस पडली. पथकाने चालकाला मास्क का लावले नाही अशी विचारणा केली व त्यानंतर तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीत विदेशी दारु तसेच बियरच्या बाटल्याचे खोके दिसून आले. चालक चालक सैय्यद मुन्ना याची चौकशी केली असता, त्याच्याकडे दारु पिण्याबाबत तसेच मद्य वाहतुकीबाबत कुठलाही परवाना नव्हता.
त्यानुसार पथकाने कारवाई करुन वाहन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आले. चौकशीत चालक सैय्यद याने हे मद्य हे आदर्श नगर येथील विजय वाईन येथून मालक मुफद्दर अली हुसने अमरेलीवाला रा. आदर्श नगर यांच्याकडे घेवून जात असल्याचे सांगितले. याप्रकरणी विजय नेरकर यांच्या फिर्यादीवरुन अवैध मद्य तस्करी केल्याप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला असून चारचाकी तसेच मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. चालकाने कोरोनापासून बचावासाठी तोंडाला कुठलेही मास्क लावलेले नसल्याने कलम १८८ प्रमाणेही कारवाई करण्यात आली आहे.