अपघातग्रस्त वाहनात गुरांची अवैध वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 05:05 PM2020-08-23T17:05:17+5:302020-08-23T17:06:44+5:30
अपघातग्रस्त वाहनात चक्क गुरांची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे.
फैजपूर, ता.यावल : भुसावळ रोडवरील आमोदा बामणोद गावाजवळ २२ रोजी मिनीट्रकचा अपघात झाल्याची घटना पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र या अपघातग्रस्त वाहनात चक्क गुरांची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेऊन गुरांना गोशाळेत रवाना केले. सहा लाखाचे वाहन व त्यात दीड लाखाची गुरे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सूत्रांनुसार, आमोदा-बामणोद दरम्यान मिनी ट्रक (क्रमांक आरजे-१४-जीई-८४६६) या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. या अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करीत असताना त्यात गुरे असल्याची बाब उघड झाली. पोलिसांनी यासंदर्भात अधिक चौकशी केली. गुरांचे तोंड व पाय बांधून विना परवाना व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमाणपत्राशिवाय अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी सहा लाखांचे अपघातग्रस्त वाहन तसेच दीड लाखाची नऊ गुरे व त्यात तीन वासरे असल्याचे पोलिसांनी सांगत गुरांची गोशाळेत रवानगी केली.
घटनास्थळी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी भेट दिली. यासंदर्भात पोलीस कॉन्स्टेबल किरण चाटे यांच्या तक्रारीवरून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक मात्र अद्याप कोणाला झाली नसल्याचे सांगण्यात आले. तपास सपोनि प्रकाश वानखडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे करीत आहे.