यावल तालुक्यातील वाघझिरा येथे अवैध लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 07:58 PM2018-11-21T19:58:59+5:302018-11-21T20:00:18+5:30
यावल , जि.जळगाव : तालुक्यातील वाघझिरा गावाजवळ सागवानी लाकडासह अवैध बांबू व त्यापासून तयार केलेले साहित्य असा सुमारे ५१ ...
यावल, जि.जळगाव : तालुक्यातील वाघझिरा गावाजवळ सागवानी लाकडासह अवैध बांबू व त्यापासून तयार केलेले साहित्य असा सुमारे ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल वनविभागाच्या गस्ती पथकाने जप्त केला आहे.
अवैध सागवानी लाकूड व बांबू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यावरून पथकाने वाघझिरा गावाजवळ जंगलात पाळत ठेवली. सातपुड्यातून बांबू व त्यापासून तयार केलेले बांबू टोपले येत असताना दिसले. वनविभागाचे गस्तीपथक दिसताच चोरटे मुद्देमाल टाकून पसार झाले. वनविभागाने त्यांचा पाठलाग केला. तेव्हा आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. नाल्याजवळ सागाचे पाच नग व ११ हजार १०० बांबू लपवून ठेवलेले होते. मुद्देमाल जप्त करून यावल डेपोत खासगी वाहनाने आणून यावल डेपोत जमा केला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास वनपाल वाघझिरा करीत आहेत.
जप्त केलेल्या मालामध्ये पाच हजार रुपयाचे किमतीचे ०.०५८ घनमीटर आकाराचे चार कटसाईज सागवान, ५०० रुपये किमतीची एक साग दांडी, नऊ हजार रुपये किमतीच्या बांबूच्या १० तयार ताट्या, नऊ हजार रुपये किमतीच्या बांबूच्या ५८ टोपल्या व अडीच हजार रुपये किमतीचे ११ मोठे टोपले, १६ हजार ६५० रुपये किमतीचे एक हजार १४० बांबू असा एकूण ५१ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
ही कारवाई यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रकाश मोरणकर व धुळे विभागीय वनअधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील गस्तीपथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील वनपाल सुनील पाटील, वनरक्षक संदीप पंडित, रवींद्र बी.पवार, पो. कॉ. सचिन तडवी , वाहनचालक भरत बाविस्कर यांनी केली आहे.