सहा तास ओपीडी बंद ठेवत आयएमएचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:19+5:302021-06-19T04:12:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ तसेच हल्लेखोरांवर दहा वर्षांच्या शिक्षेचा प्रस्ताव पारित करण्यासह विविध मागण्यांसाठी इंडियन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ तसेच हल्लेखोरांवर दहा वर्षांच्या शिक्षेचा प्रस्ताव पारित करण्यासह विविध मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जळगाव शाखेतर्फे सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत बाह्यरुग्णविभाग बंद ठेवत आंदोलन करण्यात आले. सकाळी ९ ते ११ या वेळेत डॉक्टरांसह व डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.
या आंदोलनामुळे दिवसाची वीस टक्के रुग्णसंख्या घटली होती. अन्य कुठल्याही सेवेवर परिणाम नसल्याने शिवाय अत्यावश्यक सेवा सुरूच होत्या, असे आयएमएचे सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सांगितले. आयएमए सभागृह येथे झालेल्या निदर्शनात विद्यार्थी व डॉक्टरांनी घोषणा दिल्या. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. उल्हास पाटील, डॉ. अनिल पाटील, डॉ. विलास भोळे, डॉ. राजेश पाटील, डॉ स्नेहल फेगडे, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. दिलीप महाजन, डॉ. भरत बोरोले, डॉ. तुषार बेंडाळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी बारा वाजता नियमीत रुग्णसेवा सुरू करण्यात आली. दिवसभर काळ्या फिती लावून डॉक्टरांनी काम केले. या आंदोलनाला वैद्यकीय शिक्षण असोसिएशनने पाठिंबा दर्शविला असून याबाबत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. मारोती पोटे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. वैभव सोनार, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संगीता गावित, डॉ. आस्था गनेरिवाल आदी उपस्थित होते.
जळगावच्या आंदोलनाची राष्ट्रीय स्तरावर दखल
जळगावातील आयएमएचे आंदोलन हे राष्ट्रीय आयएमए मुख्यालयाशी लिंकद्वारे थेट संवाद साधून लाईव्ह दाखविण्यात आले. राष्ट्रीय सचिव डॉ.जयेश लेले यांनी जळगावचे सचिव डॉ राधेश्याम चौधरी यांच्याशी संपर्क साधून आयोजनाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.