मयत आरपीएफ कर्मचाऱ्याच्या पत्नीस रेल्वेतर्फे तत्काळ मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 04:05 PM2019-05-18T16:05:30+5:302019-05-18T16:06:36+5:30
रेल्वेत कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले आरपीएफ कर्मचारी चंद्रकांत अढालकर यांच्या कुटुंबियांना ४८ तासांच्या आत रेल्वे प्रशासनातर्फे पेन्शनसह तत्काळ आवश्यक ती मदत करण्यात आली.
भुसावळ, जि.जळगाव : रेल्वेत कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले आरपीएफ कर्मचारी चंद्रकांत अढालकर यांच्या कुटुंबियांना ४८ तासांच्या आत रेल्वे प्रशासनातर्फे पेन्शनसह तत्काळ आवश्यक ती मदत करण्यात आली.
येथील रेल्वे यार्डातील आरपीएफ विभागात प्रधान आरक्षक पदावर कार्यरत चंद्रकांत त्र्यंबक अढालकर हे कार्यरत होते. दि.१५ मे रोजी सावदा रेल्वे स्थानकावर गुन्हे रोखणे व गाड्यांचे सील तपासणे अशी सेवा बजावत होते. यादरम्यान मालगाडीची तपासणी करीत असताना प्रधान आरक्षक चंद्रकांत अढालकर यांचा दुपारी २-३२ वाजता खांब क्रमांक कि.मी. ४५९/२९-३१ जवळ गाडी क्रमांक १३२०१ ची जबर धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला होता. दि.१६ मे रोजी प्रधान आरक्षक चंद्रकांत त्र्यंबक अढालकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या परिवारास सर्व अनुदान रक्कम ग्रॅज्युएटी, पेंशन, प्रोव्हिडंड फंड, विमा आदी ४८ तासात कागदपत्रांची पूर्तता करून विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांच्या हस्ते मयत चंद्रकांत अढालकर यांच्या विधवा पत्नी कल्पना अढालकर यांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित यांच्यासह अन्य आरपीएफ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.