गिरणा पुलाची तातडीने दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:52 AM2019-11-01T11:52:44+5:302019-11-01T11:53:32+5:30
महामार्गावरील खड्डेही बुजविणार : सेनेच्या इशाऱ्यानंतर ‘नही’ला आली जाग
जळगाव : राष्टÑीय महामार्ग क्र.६ वर जळगाव ते एरंडोल दरम्यान मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवावे, तसेच धोकादायक बनलेल्या गिरणा नदीवरील पुलाची तातडीने दुरूस्ती करावी या मागणीबाबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिल्यावर जागे झालेल्या ‘नही’ने खड्डे बुजविण्याची कार्यवाही तसेच गिरणा पुलाची दुरूस्ती तातडीने करण्याचे आश्वासन दिले.
गिरणा नदीवरील पुल उंच असून त्यावरील काँक्रीट ब्लॉकमध्ये फटी निर्माण झाल्या असून वाहन जाताना पूल हादरत आहे. तसेच पुलावरील रस्त्याचे काँक्रीट उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. या पुलावर कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने ‘नही’च्या अधिकाऱ्यांकडे केली. तसेच जळगाव ते एरंडोल या राष्टÑीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे खड्डे चुकविताना अनेक वाहनांचे अपघात होऊन जिवीत हानी होत आहे. याकडे प्रशासनातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. या राष्टÑीय महामार्गाची निविदा निघाल्याचे सांगितले जात आहे.
मात्र या कामासाठी मोठा कालावधी उलटूनही कामास सुरूवात झालेली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याआधीच गिरणावरील पुलाची तसेच जळगाव-एरंडोल महामार्गाची दुरूस्ती करावी. या कामास एक महिन्याच्या आत सुरूवात न झाल्यास शिवसेना ग्राहक कक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच काही दुर्घटना घडल्यास संबंधीत अधिकारी, ठेकेदाराविरूद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
शिष्टमंडळात कक्षाचे जिल्हा प्रमुख गजानन मालपुरे तसेच जि.प. सदस्य प्रताप पाटील, चेतन शिरसाळे, हितेश शाह, राहुल नेतलेकर, नितीन सोनवणे, मंगला बारी, चेतन प्रभूदेसाई, लोकेश पाटील, विजय चौधरी, सागर कुटुंबळे, विजय सपकाळे, भैय्या वाघ, शैलेश गुरव, राहुल पाटील, ललित कोतवाल, सोहम विसपुते आदी उपस्थित होते.
काम तातडीने करणार
या संदर्भात ‘नही’च्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांनी सांगितले की गिरणा नदीवरील पुलाची स्वत: तपासणी केली असून पूल व्यवस्थित आहे. फक्त या पुलाच्या रस्त्यावरील वरचा थर उखडला गेल्याने खड्डे पडले आहेत. पावसामुळे ते दुरूस्त करता येत नव्हते. आता तातडीने शनिवार-रविवारी हा थर टाकून दुरूस्ती केली जाईल. तसेच महामार्गावरील खड्डे बुजण्याचे कामही तातडीने हाती घेतले जाईल.