‘महाराणा प्रताप‘च्या गणपतीचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 02:33 PM2020-08-26T14:33:51+5:302020-08-26T14:34:07+5:30
महाराणा प्रताप विद्यालयातील पाच दिवसांच्या गणपतीचे २६ रोजी साधेपणाने विसर्जन करण्यात आले.
भुसावळ : येथील महाराणा प्रताप विद्यालयातील पाच दिवसांच्या गणपतीचे २६ रोजी साधेपणाने विसर्जन करण्यात आले. शाळेच्या आवारातच विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.
गणेशोत्सव म्हटला की विद्यालयात दरवर्षी मोठा जल्लोष असतो. स्थापनेपासून विसर्जनापर्यंत विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग असतो. दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांचे विविध कलागुण दाखवणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. एखादा समाजप्रबोधन करणारा विषयावर आधारित आरास केली जाते.
विसर्जनाच्या दिवशी भव्य व शिस्तबद्ध मिरवणूक काढली जाते. यात विद्यार्थ्यांचे लेझीम, झांज, दिंडी, संतांची वेशभूषा, झेंड्याची कवायत इत्यादी पथक मिरवणुकी मध्ये सामील असतात. त्यासाठी शिक्षक व विद्यार्थी काही दिवस आधी सराव करतात. मिरवणुकीमध्ये पारंपारिक ढोल व ताशे ही वाद्ये असतात. विसर्जन मिरवणुकीचे, मार्गावर ठिकठिकाणी स्वागत होते व काही दाते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करतात. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे परंपरेप्रमाणे काही कार्यक्रम घेता आले नाही. तरी परंपरा खंडित न होता उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला.
या वर्षी आराससाठी औषधी वनस्पतींची माहिती हा विषय घेऊन गुळवेल, आंबेहळद, पानफुटी, अडुळसा, वेखंड या औषधी वनस्पतींची प्रत्यक्ष रोपे ठेवून त्यांच्याबद्दलची माहितीचे फलक लावण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, वेशभूषा, घरगुती गणपतीची आरास इत्यादी स्पर्धांचे आॅनलाइन आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचाही स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सोनु मांडे यांचे मार्गदर्शन लाभले.