दिलासा..... तूर, हरभरा व उडीद डाळीच्या भावात मोठी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 01:16 PM2020-02-09T13:16:10+5:302020-02-09T13:18:29+5:30
नवीन आवक वाढल्याचा परिणाम : तूर डाळ १००० ते ११००, हरभरा डाळ १००० ते ११०० तर उडीद डाळीचे भाव १६०० ते २१०० रुपये प्रती क्विंटलने कमी
जळगाव : रब्बी हंगाम चांगला असल्याने नवीन कडधान्याची व डाळींची आवक वाढल्याने तूर, हरभरा व उडीद डाळीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. तूर डाळीचे १००० ते ११०० रुपयांनी कमी होऊन ७७०० ते आठ हजार रुपये, हरभरा डाळ १००० ते ११०० रुपयांनी कमी होऊन ५००० ते ५४०० रुपयांवर तर उडीद डाळीचे भाव १६०० ते २१०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ८००० ते ८४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून अति पावसामुळे डाळींचे भाव जास्त राहण्याची चिंताही दूर झाली आहे.
देशातील डाळ निर्मितीमध्ये जळगावचा मोठा वाटा असून येथे तयार झालेली डाळ देशातील विविध भागासह विदेशातही निर्यात होते. त्यामुळे कडधान्याच्या उत्पादनाचा एकूणच परिणाम जळगावच्या बाजारपेठेवर होत असतो. हल्ली महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान या भागातून मोठ्या प्रमाणात कच्चा माल येऊ लागल्याने डाळींचे उत्पादन वाढल्याने डाळींचे भाव कमी होण्यास मदत होत आहे.
रब्बी हंगामाची साथ
अति पावसामुळे यंदा उडीद-मुगाला मोठा फटका बसला व या डाळींचे भाव दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात वाढले. त्यात मूग डाळीने शंभरी पार केली तर उडीद डाळही नव्वदीच्या पुढे गेली. त्यामुळे रब्बी हंगामात तूर व हरभरा चांगला येऊन भाव कमी राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार यंदा सर्वत्र चांगले पाणी असल्याने व थंडीचेही प्रमाण चांगले असल्याने हरभरा व तुरीचे चांगले उत्पादन आले.
बाजारात आवक वाढली
रब्बी हंगाम चांगला आल्याने बाजारात हरभरा व तूर डाळीची आवक सुरू झाली आहे. जळगावात दररोज १० ते १५ टन तुरीच्या डाळीची आवक होत असून हरभरा डाळदेखील सात ते आठ टनापर्यंत पोहचली आहेत. जळगावातील दालमिलसह तुरीची डाळ लातूर, परतवाडा, अकोला, मलकापूर येथूनही येत आहे. अशाच प्रकारे दिल्ली, मध्यप्रदेशातून हरभरा डाळ येत आहे.
चिंता दूर
चार वर्षांपूर्वी तूर डाळीचे भाव दोनशे रुपये प्रती किलोच्या पुढे गेल्याने सर्वच चिंतीत झाले होते. त्यानंतर मात्र दुसऱ्या वर्षापासून कमी झाले. मात्र यंदा अति पावसामुळे उडीद, मुगाच्या डाळींचा अनुभव पाहता वर्षभराच्या धान्य खरेदी वेळी तूर डाळीचेही भाव कडाडता की काय, अशी चिंता होती. मात्र आवक वाढल्याने भाव कमी झाले व सर्वांची चिंताही दूर झाली आहे.
भावात घसरण
गेल्या आठ ते दहा दिवसांच्या तुलनेत डाळींचे भाव चांगलेच घसरले आहे. ८००० ते ९००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या तूर डाळीच्या भावात १००० ते १३०० रुपयांनी घसरण ती आता ७७०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे. अशाच प्रकारे ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीच्या भावात १००० ते ११०० रुपये प्रती क्विंटलने घसरण होऊन ती ५००० ते ५४०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे तर दहा हजार ते १०,५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या उडीद डाळीच्या भावात १६०० ते २००० रुपये प्रती क्विंटलने घसरण होऊन ती ८००० ते ८४०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे.
मुगाची डाळ मात्र खातेय ‘भाव’
तूर, हरभरा व उडीद डाळीच्या भावात घसरण झाली असली तरी मूग डाळ मात्र अजूनही ‘भाव’ खात आहे. ९६०० ते १०,००० रुपये प्रती क्विंटलवर असलेली मुगाची डाळ त्याच भावावर स्थिर आहे. अतिपावसामुळे मुगाला मोठा फटक बसल्याने आवकच कमी आहे, त्यामुळे या डाळीचे भाव कमी होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यंदा रब्बी हंगामात कडधान्याचे चांगले उत्पादन आल्याने सध्या डाळींची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे डाळींचे भाव कमी झाले आहे.
-प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन जळगाव.