बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:41+5:302021-04-28T04:17:41+5:30
लोकमत न्युज नेटवर्क जळगाव : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क आणि ...
लोकमत न्युज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क आणि लो रिस्क व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चाचणी करावी, तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सुचना आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात डॉ.अर्चना पाटील यांनी जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक यांच्यासोबतच व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश दिघे उपस्थित होते.
डॉ. पाटील पुढे म्हणाल्या की, बाधिताच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींचा ४८ तासाच्या आत शोध घेतला पाहिजे. तसेच मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करायला हवेत. त्यामुळे त्या भागाचे सर्वेक्षण व्यवस्थित होऊन संशयित रुग्ण शोधण्यास मदत होते. प्रतिबंधात्मक क्षेत्रात सर्वेक्षण करतांना सारी व सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण शोधले पाहिजे. कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी देण्यात येणारे थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर योग्य पध्दतीने काम करीत आहेत का? याचीही तपासणी करावी.
तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक यांनी समन्वय राखून आपल्या तालुक्यातील कामाचे नियोजन करावे. शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नियमितपणे प्रतिबंधात्मक क्षेत्र, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेटी द्याव्यात. त्याचबरोबर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये जम्बो सिलेंडरची तरतुद करावी.
ऑक्सिजन मॅनेजमेंट लागु करा
उपलब्ध ऑक्सिजनचा वापर योग्य पध्दतीने होण्यासाठी ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम लागू करा. याकरीता प्रत्येक ठिकाणी दोन स्वतंत्र नर्सची नियुक्ती करावी. रुग्णाच्या आवश्यतेनुसारच त्याला ऑक्सिजन दिला गेला पाहिजे. तसेच दर चार तासांनी प्रत्येक रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासावी. उपलब्ध ऑक्सिजन वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर रुग्णांची रक्त तपासणी नियमीत करावी, असेही त्यांनी सांगितले.
दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष नको
लसीकरण करतांना कोरोनासोबतच प्रसुती, अपघात आणि इतर दैनंदिन तपासणीच्या रुग्णांकडे दुर्लक्ष करु नये, तसेच या कामाची माहिती कोविन आणि ई विन या पोर्टलवर नियमीत अपडेट करावी, अशा सुचना देखील डॉ. अर्चना पाटील यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.