‘एनआरसी’ची अंमलबजावणी म्हणजे हिटलरशाही, जळगावात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:16 PM2019-12-21T12:16:18+5:302019-12-21T12:21:11+5:30
हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरुन विविध संघटना, पक्षांकडून धरणे आंदोलन
जळगाव : भारतात या पूर्वीही विविध जाती-धर्माच्या राजे-महाराजांनी राज्य केले, मात्र दोन समाजात त्यातून कधी तेढ निर्माण झाला नाही. मात्र सध्या केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करून धर्मा-धर्मांत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या कायद्याची सक्ती करणे म्हणजे हिटलरशाहीच आहे, असा सूर जळगाव येथे विविध राजयकीय पक्ष, संस्था संघटनांच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान उमटला. या धरणे आंदोलनासाठी प्रचंड गर्दी उसळली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी अडीच ते संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत जळगाव मुस्लीम मंचच्या माध्यमातून शहरातील विविध राजकीय पक्ष, विविध पंथ, विविध सहकारी व सामाजिक संघटना तसेच क्रीडा क्षेत्रातील संस्थांनी एकत्रित येऊन नागरिकत्व सुधारणा कायद्याचा निषेध करण्यात आला.
या वेळी दारुल कजा काझी मुफ्ती अतिर्कूर रहेमान, हाफिस खालीद, इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष करीम सालार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, मुस्लीम मंचचे समन्वयक फारुख शेख, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जिया बागवान, सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे मुकुंद सपकाळे, डॉ.जावेद खान, सुन्नी मशिदचे शरीफ शाह, सुन्नी जामा मशिदचे अयाज अली, जमात इस्लामीचे आमिर सोहेल, इस्लामी युथ फाउंडेशनचे मौलाना हाफिस फरहान आदी उपस्थित होते.
सुरुवात मुफ्ती अतीर्कूर रहेमान यांच्या कुराण पठणाने झाली. हाफिस खालीद यांनी नाथ सादर केली तर हफीज अली यांनी नजम (कविता) सादर केली. प्रास्ताविक फारुक शेख यांनी केले. त्यात त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा व त्यामुळे होणारे दुष्परिणाम या विषयी माहिती दिली.
डॉ.जावेद यांनी आपल्या भाषणात या पूर्वी राज्य केलेल्या राजे-महाराजांच्या काळातील आठवण करून देत सांगितले की, त्या राजा-महाराजांनी अशा प्रकारचे भेदभाव केले नाही. शरीफ शाह यांनी भाषणात निषेध करून हा कायदा म्हणजे हिटलरचा कायदा आहे, असे नमूद केले. आमिर सोहेल यांनी हा कायदा कशा प्रकारे दोन समाजात तेढ निर्माण करणारा ठरू शकतो, या विषयी माहिती दिली. प्रतिभा शिंदे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. आयाज अली, मुकुंद सपकाळे, मौलाना हाफिस फरहान, करीम सालार, गफ्फार मलिक, वासंती दिघे, मुफ्ती हारुन, जिया बागवान यांनी मनोगत व्यक्त केले.
अन्यथा हिंसक वळण
हा कायदा लागू करण्यात येऊ नये अन्यथा शांतता मार्गाने चालणाऱ्या या आंदोलनास हिंसक वळण मिळेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. या सर्व प्रकारास पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार ठरतील, असा सूरदेखील या वेळी उमटला.
अनेकांच्या डोळ््यात तरळले अश्रू
समारोप वेळी विविध ठराव पारित करण्यात आले. त्या ठरावाचे वाचन करण्यात आले. आंदोलनास कोठेही गालबोट लागू नये तसेच सर्वत्र शांतता नांदावी यासाटी दुआ (प्रार्थना) करण्यात आली व कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी उपस्थितांच्या डोळ््यात अश्रू तरळले होते.
शिस्तबद्धतेचे दर्शन
या धरणे आंदोलनात हजारोंच्या संख्येन नागरिक सहभागी झाले होते. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर मोठी गर्दी उसळली होती. हजारोंची संख्या असली तरी सर्वांनी अत्यंत शांततामय वातावरणात व शिस्तबद्धरित्या धरणे आंदोलन केले. कोणाला त्रास होणार नाही व गालबोट लागणार नाही, यासाठी वक्त्यांनीदेखील तसे आवाहन केले. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या धरणे आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याचे लक्षात घेता पोलीस बंदोबस्त, विविध पथके, अग्नीशमन दल पाचारण करण्यात आले होते. आंदोलनात उपस्थितांची संख्या एवढी होती की, स्वातंत्र्य चौक ते आकाशवाणी चौक हा रस्ता बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आला होता.
अनिस शहा, समीर शेख, सानेर सैयद, रऊफ खान, उमर काफील, बशीर बुºहानी, जमील शेख, फिरोज मुलतानी यांच्यासह हजारो जणांनी परिश्रम घेतले