चाळीसगावात सुधारित जलवाहिनी योजनेला अखेर मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 01:06 AM2018-10-18T01:06:33+5:302018-10-18T01:07:19+5:30
सविस्तर प्रकल्प अहवालातील (डीपीआर) बहुचर्चित शहरांतर्गत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीसह नव्याने उभारण्यात येणाºया १५ लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभ योजनेस पालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत अखेर मंजुरी देण्यात आली. यामुळे लवकरच शहराच्या विविध भागात नविन जलवाहिन्या टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चाळीसगाव, जि.जळगाव : सविस्तर प्रकल्प अहवालातील (डीपीआर) बहुचर्चित शहरांतर्गत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीसह नव्याने उभारण्यात येणाºया १५ लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभ योजनेस पालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत अखेर मंजुरी देण्यात आली. यामुळे लवकरच शहराच्या विविध भागात नविन जलवाहिन्या टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्ष आशाबाई चव्हाण यांच्यासह शविआचे गटनेते राजीव देशमुख, भाजपाचे गट नेते राजेंद्र चौधरी, आरोग्य सभापती रंजना सोनवणे, पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील, बांधकाम सभापती चंद्रकांत तायडे, शिक्षण सभापती सूर्यकांत ठाकूर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी सभेला उपस्थित होते.
चाळीसगाव शहरासाठी असणारा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) यापूर्वीच मंजूर करण्यात आला असून, यातील काही योजनांना विरोध दर्शविण्यात आला होता. बुधवारी सकाळी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सुधारीत पाणीपुरवठा योजनेसह प्रदीपदादा नगर, महाराणाप्रताप नगरातील गटार व मटन मार्केट परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येणार असून ही सुधारीत पाणीपुरवठा योजना विरोधकांनी आक्षेप घेतल्यामुळे वादाच्या भोव-यात सापडली होती. विरोधकांनी योजनेतील काही त्रुटी व उणिवांवर बोट ठेवले होते. २०५३ पर्यंतच्या लोकसंख्येचे उद्दिष्ट ठेऊन योजनेचा आराखडा असून आमदार उन्मेष पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने योजनेसाठी ६२ कोटी २० लाख रुपये मंजुरही केले आहे. यात शहरातील अंतर्गत जलवाहिन्या नव्याने टाकण्यासह अजून एक १५ लाख लटर क्षमतेचा जलकुंभही उभारला जाणार आहे. स्थायी समितीच्या सभेत योजनेला हिरवी झेंडी दाखविण्यात आल्याने योजनेतील अडथळा दूर झाला आहे.
सुधारित पाणीपुरवठा योजनेत विरोधकांनी दाखविलेल्या त्रुटी दूर केल्या. शहरासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारी ही योजना स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आली. योजनेमुळे आगामी काळात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याची बचतही होणार आहे.
- आशालता चव्हाण, नगराध्यक्षा, चाळीसगाव