नव्या वर्षात राहणार कामगिरीला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 07:49 PM2020-01-05T19:49:50+5:302020-01-05T19:50:39+5:30

महाराष्टÑातील राजकीय स्थिती पाहता प्रत्येक राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांना काम करुन दाखवावेच लागेल, भाजप जसा मावळत्या वर्षात टीकेचा धनी ठरला तीच टीका महाआघाडीला नव्या वर्षात सहन करावी लागली

Importance of performance in the New Year | नव्या वर्षात राहणार कामगिरीला महत्त्व

नव्या वर्षात राहणार कामगिरीला महत्त्व

Next

मिलिंद कुलकर्णी
सत्तेसाठी काहीपण हे राजकीय पक्षांचे धोरण झाले असले तरी जनता आता कामगिरीला महत्त्व देत आहे. अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न, पहिल्याच दिवसापासून सरकारवर टीकास्त्र यामुळे भाजप टीकेचा धनी ठरला. महाविकास आघाडीलाही सरकार स्थापना, विस्तार, खातेवाटप यासाठी घातलेल्या घोळामुळे टीका सहन करावी लागली. प्रत्येक राजकीय पक्ष, मंत्री, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना जबाबदारीचे पालन करुन काम दाखवावे लागणार आहे. अटीतटीची स्पर्धा असल्याने जनतेचे त्यांच्या कामगिरीवर लक्ष राहणार आहे.
महाविकास आघाडी सरकारचा बहुप्रतिक्षित विस्तार आणि खातेवाटप निर्विघ्नपणे पार पडले. खान्देशात काही असंतोष दिसून आला नाही. अ‍ॅड.के.सी.पाडवी या नंदुरबारच्या सातवेळा आमदार राहिलेल्या लोकप्रतिनिधीला आदिवासी विकास खात्याचे कॅबीनेट मंत्रिपद, खान्देशची मुलूखमैदान तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता या खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. खान्देशात दोनच मंत्रिपदे मिळाली. गेल्यावेळी साडेतीन मंत्रिपदे होती. एकनाथराव खडसे, गिरीश महाजन, जयकुमार रावल हे कॅबिनेट तर गुलाबराव पाटील यांच्याकडे राज्यमंत्रिपद होते. खडसे दीड वर्षात मंत्रिमंडळाबाहेर पडले तर रावल व पाटील यांचा उशिरा प्रवेश झाला. युती सरकारच्या काळात नंदुरबार जिल्हा मंत्रिपदाविना राहिला. यंदा धुळ्याच्या वाटेला ही भूमिका आलेली आहे. पाडवी, पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपद येईल. धुळ्याचे पालकत्व पुन्हा मालेगावच्या दादा भुसेंकडे राहते काय, हे बघायला हवे. गुलाबरावांना आणखी दमदार खाते हवे होते, अशी अपेक्षा जनसामान्यांची होती. त्यामानाने भुसेंना कृषी खाते मिळाले आहे.
विस्तार आणि खातेवाटप झाल्याने आता मंत्र्यांनी कामाला सुरुवात करायला हवी. दोन्ही मंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. खान्देशातील २५ पैकी १० तालुके हे आदिवासी बहुल तालुके आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. युती सरकारच्या काळात आदिवासी विकास विभागाकडून समाधानकारक कामगिरी झाली नाही. डॉ.विजयकुमार गावीत यांनी या खात्यावर छाप उमटवली होती. तशा कामगिरीची आता पाडवी यांच्याकडून अपेक्षा आहे. खान्देशात काँग्रेसची मोठी पडझड झाली असल्याने पाडवी यांना पक्षाला बळकटी देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील.
गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता हे खाते आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पाणी योजनांचा अंतर्भाव या विभागात येतो. त्यांच्या मंत्रिपदाचा लाभ खान्देशला मिळू शकतो आणि पाटील यांचा कामाचा झपाटा आणि तडफ पाहता निश्चित त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
मंत्रिपदासोबत महामंडळांच्या नेमणुका लवकर व्हायला हव्यात. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने जी थोडीफार नाराजी असेल ती दूर सारण्यासाठी या नियुक्ती महत्त्वाच्या ठरतील. तीन पक्ष आणि आमदार यांना सामावून घेताना मोठी कसरत करावी लागणार आहे. सेना प्रथमच अग्रक्रमाच्या भूमिकेत आली असल्याने नेते व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दुसरीकडे पाच वर्षांचा दुष्काळ संपून दोन्ही काँग्रेसला सत्ता पुन्हा मिळाली आहे. पाच वर्षे पक्षासोबत राहण्याचे फळ मिळायला हवे, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. त्यातून प्रत्येकाचे समाधान करण्याचे अवघड आव्हान नेतृत्वापुढे आहे.
नंदुरबार-धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतून जनतेचा कल लक्षात येईल. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात होणारी ही निवडणूक सर्वार्थाने महत्त्वपूर्ण आहे. नेते तेच असले तरी पक्ष बदलले आहेत. अमरीशभाई पटेल, राजवर्धन कदमबांडे, दीपक पाटील हे भाजपकडे, चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेकडे तर अभिजित पाटील काँग्रेसकडे आहेत. जनता कोणत्या समीकरणाच्या बाजूने कौल देते, यावर पुढील गणिते अवलंबून राहतील.

Web Title: Importance of performance in the New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.