अमळनेरात विविध सात ठिकाणी सट्टा अड्ड्यावर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 22:59 IST2021-01-21T22:59:23+5:302021-01-21T22:59:48+5:30
अमळनेरात डीवायएसपी यांच्या पथकासह स्थानिक पोलिसांनी सात ठिकाणी छापे टाकून सट्टा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

अमळनेरात विविध सात ठिकाणी सट्टा अड्ड्यावर छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : डीवायएसपी यांच्या पथकासह स्थानिक पोलिसांनी सात ठिकाणी छापे टाकून सट्टा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. वारंवार छापे पडूनदेखील अवैध व्यवसायावर नियंत्रण झालेले नाही.
डीवायएसपी राकेश जाधव यांनी त्यांच्या पथकातील विलास गायकवाड, पंकज पाटील, हितेश बेहरे, सुहास पाटील यांना शहरातील अवैध धंदे सट्टा चालवणाऱ्यांवर छापे टाकण्यासाठी पाठवले. त्यांनतर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनीही पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, मेघराज महाजन, रवींद्र पाटील, दीपक माळी, सुनील हटकर, विनोद धनगर याना पाठवून कारवाई केली. यापूर्वी आयजींच्या पथकाने दोन तीनदा छापे टाकल्यांनतरही त्याचठिकाणी पुन्हा सट्टा जुगार जोरात सुरू असल्याचे आढळून आले.
पोलीस कॉलनी व बसस्थानकदरम्यान गांधीनगर भागात रवींद्र पुंजु चित्ते यांच्याकडून १३७५ रुपये, सानेगुरुजी मार्केटमधील गणेश जगतराव पाटील यांच्याकडून १०८० रुपये, मिळचाळ भागातील संदीप रमेश चव्हाण यांच्याकडून ४५० रुपये, मच्छीमार्केटमधील हिरालाल चिंतामण जाधव १४५० रुपये, जुन्या बसस्टँडजवळ अंबर युवराज पांचाळ याच्याकडून १०४५ रुपये, राणी लक्ष्मीबाई चौकात गणेश चौधरी, दगडी दरवाज्याजवळ विजय आत्माराम मगरे यांच्याकडून ११५० रुपये तर नांद्री गावाच्या बसस्टँडजवळ राजेंद्र वासुदेव मराठे यांच्याकडून १४८० रूपये आणि प्रत्येकाकडून सट्टा जुगारची साधने असा माल जप्त करून सर्वांविरुद्ध मुंबई जुगार कायद्यांनव्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास अमळनेर पोलिस करत आहेत.