चाळीसगावकर ‘प्राजंक्स’च्या गुणवत्तेचा ठसा अमेरिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 02:36 PM2021-05-24T14:36:00+5:302021-05-24T14:36:35+5:30
चाळीसगावकर प्राजंक्स संजय सराफ याने रोबोटिक्स व्हरसिस्टर परिक्षेत अमेरिकेत पहिल्या क्रमांकावर मोहोर कोरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : शिक्षणातील गुणवत्तेला मर्यादा नसतात. सीमांचे बंधनही नसते. चाळीसगावकर प्राजंक्स संजय सराफ याने हेच सिद्ध करीत थेट अमेरिकेतच आपल्या गुणवत्तेचा ठसा कोरला आहे. कोरोनाकाळात अमेरिकेतच राहून त्याने रोबोटिक्स व्हरसिस्टर परिक्षेत पहिल्या क्रमांकावर मोहोर कोरली. त्याच्या शिक्षण यशाने चाळीसगावचा झेंडा पुन्हा एकदा अटकेपार रोवला आहे. प्राजंक्सच्या या भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहरातील जुने सराफ व्यावसायिक सोमनाथ शंकर सराफ यांचा प्राजंक्स हा नातू. त्याचे वडिल संजय चाळीसगावातच सराफ व्यवसाय करतात. प्राजंक्स बालपणापासूनच अभ्यासू असल्याचे त्याचे वडिल संजय सराफ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्याचे १२वीपर्यंतचे शिक्षण चाळीसगावीच झाले.
हुबळी ते अमेरिका आणि प्रथम क्रमांक
१२वीनंतर रोबोटिक्स व्हरसिस्टरचे शिक्षण घेण्यासाठी प्राजंक्स कर्नाटकमधील हुबळी येथे गेला. येथे दोन वर्षे त्याने याच शिक्षणाचे धडे गिरवले. यानंतर रोबोटिक्स व्हरसिस्टर शिक्षणासाठी त्याने अमेरिकेत पाय ठेवला. प्राजंक्सला एक लहान भाऊ व बहिण आहे. त्याची आई शंकुतला या गृहिणी आहेत.
कोरोनाकाळात रोवली यशाची पताका
प्राजंक्स गेली चार वर्षे अमेरिकेतच असून गेल्या वर्षापासून कोरोनाने जग व्यापले असतानाही त्याने आपल्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. कोरोनाकाळात तो अमेरिकेतच होता. याच काळात त्याने जिद्दीने अभ्यास करुन ‘मेसेनझ्युटिअर युनिव्हर्सिटीमधून रोबोटिक्स व्हरसिस्टर’मध्ये एमएसची पदवी पूर्ण करताना पहिल्या क्रमांकाचा झेंडा रोवला.
जगाचे रहाटगाडे सुखाचा रस्ता आला तरी धावतेच आणि संकटांनी वाट अडवली म्हणून थांबत नाही. शिक्षणाचेही तसेच आहे. विचलित न होता त्याचे बोट धरुन चालत रहायचे. जीवतोड मेहनत करायची. यश शंभर टक्के मिळतेच. कोरोनाचा खडतर काळ आणि परिक्षा असा मेळ घालत अभ्यास केला. जराही विचलीत झालो नाही. पहिला क्रमांक मिळाला, याचा आनंद मोठाच आहे.
-प्राजंक्स संजय सराफ