कुलस्वामिनीच्या कुळोत्सवातील वहीगायनाची थाप सोडतेय लोकसंगीताची छाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:01 PM2021-01-02T16:01:25+5:302021-01-02T16:02:49+5:30
वह्या ढोलकीच्या व डफावर थिरकणारी थाप देत गाण्याची लोकसंगिताची लोकपरंपरा आजही आपली थाप या कुळाचारात कायम ठेवून आहे.
किरण चौधरी
रावेर : प्रत्येक परिवाराचे कुलदैवत असलेल्या श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी, श्री रेणुका माता, श्री सप्तश्रृंगी माता, श्री जोगेश्वरी माता, श्री एकवीरा माता यांचा कुळाचारातील मार्गशीर्ष शु।।, माघ शु।। व फाल्गुन शु।। पौर्णिमेनंतर येणार्या शुक्रवारी साजरा करण्यात येत असलेल्या कुलोत्सवात वहीगायनातील ढोलकी व डफावरची थिरकणारी थाप कुलस्वामिनीच्या महिमा गाताना आजही समाजमनात आपल्या लोकसंगिताची छाप आजही कायम आहे. किंबहुना, आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगातही कुळाचारात भाऊबंदकीचाही मेळा फुलत असल्याची बाब समाजमनासमोर आदर्श उभा केला आहे.
खान्देशवासीयांच्या कुळाचारात कुलदेवतेचा कुलोत्सव मार्गशीर्ष, माघ व फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेनंतर येणार्या शुक्रवारी साजरा करण्याची प्रथा आजही रूढ आहे. किंबहुना, या कुलस्वामिनीच्या कुलोत्सवानिमित्तच वहीगायनाची लोकपरंपरा अविरतपणे जोपासली आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वृद्धाश्रमाची परंपरा व विभक्त कुटुंबांच्या भिंती वाढीस लागली असताना, मात्र कुलदेवतेच्या चरणी शरण येण्यासाठी कुलोत्सवात दरी मिटून एकत्र येणार्या भाऊबंदकीचा मेळा फुलत असल्याचे वैशिष्ट्य दिसून येते.
किंबहुना, कुलोत्सवाचा कुळधर्म गुरूवारी रात्री सामूहिक भोजनाने सुरू होत असतो. शुक्रवारी सकाळी कुलदेवतेचे सुपूजन केल्यानंतर साखर म्हणून संबोधली जाणारी खीर, पुरणपोळी, लाडकं म्हणून संबोधले जाणारे वांग्यांचे फोळणी न देता भाजलेले भरीत व हरभरा डाळीचे वाफेवर फुलववेली नारळ असा महाप्रसाद तयार करण्यासाठी भाऊबंदकीतील सुवासिनी एकत्र येऊन महाप्रसाद तयार केला जातो.
दरम्यान, कुलदेवतेच्या महापूजेत आवश्यक असलेली कुंभाराच्या घरची मातीची भांडी असलेली " रत्न " आणण्यासाठी वहीगायनाची परंपरा आजही जोपासली जात आहे. ढोलकी व डफावर थिरकणारी थाप, तथा चोंडकी वादकाच्या तुणतुणणार्या मंजूळ स्वरात कुलस्वामिनीच्या महिमा असलेल्या वह्या, कथानकासह उंच सुरेल स्वरातील वहीगायकाने गायलेली वही व त्यांना साथसंगत देणार्या जिलकरींचा प्रतिसादही झिम्मा फुगडी खेळाच्या तालात कुलदेवतेच्या नामस्मरणात रममाण करून जातात.
"आईची येण्याची झाली तयारी अन् रत्न घेण्याची झाली तयारी..." , " गडाची अंबा निघाली नी पुजारी डोलायला लागली..." ,
" आजुबाजूने डोंगरझरी नी कानबाई माझी फुगडी खेळी " , " कसा करू मी शृंगार बाई मायबाईचा.." , " कानबाई चालली गंगेवरी नी साखर पेरत चालली.." "माळ्याच्या मळ्यामंधी सुपारी हिचे बनं.. " जायाचं वणीच्या गडाला, जाऊ द्या मला..", " कान्होळ चालली कण्हेराला..." अशा कुलस्वामिनीचा महिमा असलेल्या वह्या ढोलकीच्या व डफावर थिरकणारी थाप देत गाण्याची लोकसंगिताची लोकपरंपरा आजही आपली थाप या कुळाचारात कायम ठेवून आहे.
खानापूर येथील नवरंग वही मंडळातील वहीगायक सुरेश पाटील, पंडित चौधरी, सचिन तेली, गोकुळ राजपूत, मुकेश राजपूत, विक्रम राजपूत, रवींद्र राजपूत, ढोलकी सुधाकर ढोलकी व भागवत कोळी (अजनाड ), चोंडकीवादक अशोक धांडे यांनी आजही आपली परंपरा कायम राखली आहे.