आता तरी सुधरा... नियम पाळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:14 AM2021-04-05T04:14:58+5:302021-04-05T04:14:58+5:30
एकीकडे जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी आदेश काढून नियम पाळण्याचे आवाहन करण्यात ...
एकीकडे जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी आदेश काढून नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडून त्याच तत्परतेने त्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शासन, प्रशासकीय यंत्रणा ही लोकांमध्ये जनजागृती करून ही साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिल्या लाटेनंतर साथ आटोक्यात आली असे वाटत असतानाच बेफिकीरपणा वाढल्याने पहिल्या लाटेपेक्षाही अधिक अशी दुसरी लाट आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जिल्ह्यात दररोज हजार-बाराशे रुग्ण आढळून येत आहेत. गंभीर रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक राहिलेले नाहीत. त्यांना ऑक्सिजनची गरज भासली तर ती यंत्रणाही तोकडी पडत आहे. सामाजिक संस्थांनी ही अडचण ओळखून पुढे येत मदतीचा हात दिला आहे. या सामाजिक संस्थांकडून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन लोकांना माफक शुल्क आकारून उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळत आहे. कोविड सेंटर्सदेखील फुल्ल असल्याने मोहाडी येथील बांधकाम सुरू असलेल्या रुग्णालयात तातडीने व्यवस्था करीत मोठे कोविड केअर सेंटर प्रशासनाकडून सोमवारपासून सुरू करण्यात येत आहे. जनतेच्या कराच्या पैशांमधूनच हा सर्व खर्च होत आहे. त्यामुळे जनतेनेही शासन, प्रशासनाकडून वेळोवेळी केले जाणारे नियम, आवाहन काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. शासन, प्रशासन हे नागरिकांचा जीव वाचविण्यासाठीच ही सर्व धडपड करीत आहे, हे जनतेला माहिती असतानाही व परिस्थिती गंभीर बनलेली असतानाही नागरिक मात्र बाजारात गर्दी करताना दिसून येत आहेत. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन सातत्याने केले जात आहे. मास्क वापरण्याचे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र प्रत्येकजण सोयीने वागत असल्याने रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याचेच चित्र आहे. शेवटी शासन, प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांनाही एक मर्यादा आहे. ती जर नागरिकांनी लक्षात घेतली नाही व नियम पाळले नाहीत तर नंतर बेड मिळाला नाही, ऑक्सिजन मिळाला नाही, रेमडेसिवीर सारखे महत्वाचे इंजेक्शन मिळाले नाही म्हणून जीव गमवायची वेळ येऊ शकते. प्रशासन रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी पावले उचलत आहेच, पण नागरिकांनी ते खरेदी करण्याची वेळच येणार नाही, अशीच खबरदारी घेतली तर काय हरकत आहे?