आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी फटका, सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दरही वधारले
By विजय.सैतवाल | Published: April 1, 2023 02:55 PM2023-04-01T14:55:59+5:302023-04-01T14:56:08+5:30
तयार दागिन्यांवरही कराचा भार वाढला
जळगाव - सरत्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सातत्याने वाढ होत गेलेल्या चांदीच्या भावात १ एप्रिल रोजी पुन्हा ६५० रुपयांची वाढ होऊन ती ७२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. गेल्या १० दिवसांमध्ये चांदीत तर तीन हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्याही भावात १० दिवसांपासून वाढ सुरू असून १ रोजी ते ५९ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर राहिले.
नवीन आर्थिक वर्षात अर्थात १ एप्रिलपासून सोने, चांदीच्या इमीटेशन ज्वेलरीवर आयात शुल्क वाढविल्याने त्यांचे भाववाढीचे संकेत दिले जात होते. मात्र या तयार दागिन्यांसह गेल्या १० दिवसांपासून सोने-चांदीतही वाढ गेली. आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढत असल्याने ही भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
१० दिवसांपूर्वी २२ मार्च रोजी ६९ हजार रुपये प्रति किलोवर असलेल्या चांदीच्या भावात २३ रोजी ८०० रुपयांची वाढ झाली. २४ रोजी पुन्हा २०० रुपयांची वाढ झाली व २५ मार्चपर्यंत ती ७० हजारांवर स्थिर राहिली. २६ रोजी पुन्हा ५०० रुपये, २९ व ३० रोजी प्रत्येकी ३०० रुपयांची वाढ होऊन ती ७१ हजारांवर पोहचली. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी ३१ मार्च रोजी पुन्हा ८५० रुपये तर १ एप्रिल रोजी ६५० रुपयांची वाढ होऊन चांदी ७२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. अशाच प्रकारे २२ मार्च रोजी ५९ हजार रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात वाढ होत जाऊन ते १ एप्रिलपर्यंत ५९ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.