१९९०मध्ये शरयूने अस्वस्थ केले; गोळीबारात जखमी कारसेवक भेटले, आज मंदिर झाल्याचे समाधान!

By अमित महाबळ | Published: January 21, 2024 10:19 AM2024-01-21T10:19:42+5:302024-01-21T10:20:27+5:30

कारसेविका ऋता मेलग यांनी सांगितल्या विशेष आठवणी

In 1990 Sharayu upset us today met Karsevak injured in firing and now satisfied with Ram Mandir Pranpratishtha at Ayodhya | १९९०मध्ये शरयूने अस्वस्थ केले; गोळीबारात जखमी कारसेवक भेटले, आज मंदिर झाल्याचे समाधान!

१९९०मध्ये शरयूने अस्वस्थ केले; गोळीबारात जखमी कारसेवक भेटले, आज मंदिर झाल्याचे समाधान!

अमित महाबळ, जळगाव: सन १९९० चा तो दिवस आजही स्मरणात आहे. भाऊबीज झालेली. दुसऱ्याच दिवशी आदेश आले, की कारसेवेसाठी अयोध्येला कूच करा. अयोध्येत गेल्यावर दिसलेले दृश्य, श्रीरामलल्ला व रामभक्त हनुमान यांचे घेतलेले दर्शन हे सर्व प्रसंग आजही आठवणीत आहेत, असे कारसेविका ऋता मेलग यांनी सांगितले.

ऋता मेलग यांनी सांगितले, की १९९० मधील कारसेवेसाठी जळगाव जिल्ह्यातून त्या स्वत: व काकी अग्रवाल या दोनच महिला होत्या. कारसेवा समितीने सांगताच अनेक कारसेवक ताप्ती गंगा एक्स्प्रेसने अयोध्येला निघाले. आमच्यात काही शिवसैनिकही होते. सर्वांना दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता नैनीला उतरविण्यात आले. पोलिस मागावर होते. पुढचा पायी प्रवास जंगलातून सुरू झाला. अयोध्येच्या गाडीत बसलो; पण, पोलिसांनी मध्येच अटक केली. त्यावेळी कारसेवकांच्या गर्दीने कारागृहे भरलेली होती, त्यामुळे पोलिसांनी दोन रात्र बसमध्येच सर्वांना फिरवत ठेवले. अखेर फरीदाबादच्या कारागृहात नेण्यात आले. नंतर महिलांची व्यवस्था स्वतंत्र ठिकाणी केली गेली. यादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींच्या अटकेच्या निषेधार्थ उपोषण केल्याचेही मेलग यांनी सांगितले.

पितृऋण असे फेडले...

वडील प्रा. विष्णू घनश्याम देशपांडे यांनी व महंत अवैद्यनाथ यांनी १९४९ मध्ये श्रीराम व काशी विश्वेश्वर मंदिरासाठी अयोध्येत सत्याग्रह केला होता. वडील नंतर हिंदू महासभेचे देशातील पहिले खासदार झाले. ते ग्वाल्हेर व गुना मतदारसंघातून एकाचवेळी निवडून आले होते. कारसेवेत सहभागी होऊन वडिलांचे ऋण फेडल्याचे ऋता मेलग यांनी सांगितले.

‘ते’ दृश्य आजही आठवते...

कारागृहातून २१ व्या दिवशी सुटका होताच अयोध्या गाठली. प्रभू श्रीराम व मारुतीरायाचे दर्शन घेतले. गोळ्या लागून जखमी झालेले कारसेवक भेटले. शरयू नदीकिनारी कारसेवक, साधूंचे मृतदेह पाहून मन सुन्न झाले. कोठारी बंधूंना गोळ्या लागून भिंतींवर उडालेले रक्तही पाहिले. आज मंदिर झाल्याचे समाधान असल्याचे ऋता मेलग यांनी सांगितले.

राष्ट्रासाठी, मोदींसारख्या नेत्यासाठी हा नित्यनियम

ऋता मेलग २०१४ पासून दररोज सकाळी श्रीरामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र व चारश्लोकी रामायण म्हणतात. सर्वप्रथम राष्ट्रासाठी, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर नेत्याच्या रक्षणासाठी ही स्तोत्र म्हणत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही मुले लहान, शेजारच्यांनी सांभाळ केला...

अयोध्येत कारसेवेसाठी गेले, त्यावेळी मुले पाच व दहा वर्षांची होती. त्यांना सोबत नेणे शक्य नव्हते. त्यामुळे घरीच ठेवले. शेजारच्यांनी या मुलांचा आपलेपणाने सांभाळ केला. पती सारंग मेलग यांच्या नोकरीमुळे त्यावेळी अमळनेरला राहायला होत्या. अयोध्येला कूच केल्यानंतर २८ व्या दिवशी त्या घरी परतल्या.

Web Title: In 1990 Sharayu upset us today met Karsevak injured in firing and now satisfied with Ram Mandir Pranpratishtha at Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.