४ तासात मतदानाची टक्केवारी १७ वर! रावेरमध्ये सर्वाधिक : सुर्यनारायण पावल्याने प्रशासनाला मिळाला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:59 AM2024-05-13T11:59:04+5:302024-05-13T11:59:15+5:30
रावेर मतदारसंघात सकाळपासूनच रांगा लागून आहेत. तीच स्थिती जळगाव मतदारसंघात आहे. मतदान प्रक्रियेत कुठल्याही केंद्रावर अडचण निर्माण झालेली नाही.
कुंदन पाटील
जळगाव : लोकसभेच्या जळगाव आणि रावेर मतदारसंघात सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान मतदानाची टक्केवारी अनुक्रमे १६.८९ आणि १९.०३ इतकी झाली आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रात रांगा कायम असून ही टक्केवारी दुपारी १ वाजेपर्यंत तिशीवर जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
रावेर मतदारसंघात सकाळपासूनच रांगा लागून आहेत. तीच स्थिती जळगाव मतदारसंघात आहे. मतदान प्रक्रियेत कुठल्याही केंद्रावर अडचण निर्माण झालेली नाही. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया सुलभपणे सुरु आहे. मतदार केंद्रांवर पिण्याच्या पाण्यासह सर्वच सुविधा उपलब्ध असल्याने मतदारही स्वत:हून मतदानासाठी पुढे येत असल्याचे दिसून येत आहे.
सुर्यनारायण पावला
सोमवारी सकाळपासूनच वातावरणात गारवा होता. त्यामुळे मतदार मोठ्या प्रमाणावर सरसावला. एरव्ही सकाळी १० वाजेनंतर तापमानाचा पारा ३८ अंशावर असतो. मात्र सोमवारी सकाळी १० वाजता तापमानाचा पारा ३६ तर सकाळी ११ वाजता ३८ अंशावर गेला होता. त्यामुळे पहिल्या चार तासात मतदानाच्या टक्केवारीला बुस्टर मिळाले आहे.