जळगावमधील एरंडोलनजीक भीषण अपघातात; भाऊ- बहिण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 08:45 PM2022-02-12T20:45:09+5:302022-02-12T20:50:28+5:30
देवदर्शन करुन परतणाऱ्या कुटुंबीयांच्या कारला मालवाहू कंटेनरने धडक दिली.
एरंडोल जि. जळगाव : बोरकुंड ता. धुळे येथून देवदर्शन करुन परतणाऱ्या कुटुंबीयांच्या कारला मालवाहू कंटेनरने धडक दिली. यात भाऊ - बहीण जागीच ठार तर कारमधील पाच जण जखमी झाले. ही घटना एरंडोलनजीक राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. प्रकाशचंद राजमल बागरेचा (वय ७५, रा, दुर्वांकुर पार्क, वाघुळदे नगर, जळगाव) आणि कमलाबाई न्याहलचंद बम (७९, रा. प्रतापनगर, जळगाव ) अशी ठार झालेल्या भाऊ- बहिणीचे नाव आहे.
जळगाव येथील व्यावसायीक नरेंद्र जैन हे (क्र. एम.एच.१९ सी.व्ही. ७७१७) या चारचाकी वाहनाने बोरकुंड जि.धुळे येथे ''रामदेव ग्यारस, निमित्त परिवारास देवदर्शनास गेले होते. तिथून परतीच्या प्रवासात असताना एरंडोलनजीक मालवाहू कंटेनरने (क्र. एम.एच.४६ बी.बी. ८५३२) त्यांच्या कारला समोरुन जोरदार धडक दिली. यात वरील दोघे जागीच ठार झाले. तर योगीता नरेंद्र जैन, नरेंद्र जैन, नमन नरेंद्र जैन, विजय शांतीलाल जैन, लभोनी नरेंद्र जैन हे पाच जण जखमी झाले आहेत.