चाळीसगावात बिबट्याचा बछडा अडकला पॉलिहाउसच्या जाळीत; वनविभागाने सोडविले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 10:00 PM2023-07-13T22:00:03+5:302023-07-13T22:03:01+5:30
गुरुवारी सकाळी १० वाजता वनविभागाच्या प्रयत्नाने जाळीतून सुटका झालेल्या या बछड्याने शेजारील शेतात धूम ठोकली. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
जिजाबराव वाघ -
चाळीसगाव : शिकार शोधण्यासाठी बुधवारी (दि. १२) रात्री निघालेला ७ ते ८ महिन्यांचा बिबट्याचा बछडा पॉलिहाउसच्या जाळीत अडकला. गुरुवारी सकाळी १० वाजता वनविभागाच्या प्रयत्नाने जाळीतून सुटका झालेल्या या बछड्याने शेजारील शेतात धूम ठोकली. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
तिरपोळ - वरखेडे रस्त्यालगत संजय पाटील या शेतकऱ्याचे शेत असून, पॉलिहाउस केले आहे. बुधवारी रात्री पॉलिहाउसकडे आलेला बिबट्याचा बछडा या जाळीत अडकला. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता पाटील यांच्याकडील कामगार पॉलिहाउसमध्ये गेल्यानंतर हा बछडा त्यांच्या नजरेस पडला. बछडा त्यांच्याकडे पाहून गुरगुरला. यानंतर या कामगाराने तेथून पळ काढला.
संजय पाटील यांनी चाळीसगाव वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना कळविले. वनविभागाने आपल्या टीमसह घटनास्थळी येऊन दोन तास प्रयत्न करीत बछड्याची जाळीतून सुटका केली. सुटका होताच बछड्याने शेजारील उसाच्या शेतात धूम ठोकली.
चाळीसगावात बिबट्याचा बछडा अडकला पॉलिहाउसच्या जाळीत; वनविभागाने सोडविले#Leopardpic.twitter.com/XHEv3NRewj
— Lokmat (@lokmat) July 13, 2023
शेतकऱ्यांचा रोष; वनविभागाने काढली समजूत -
सद्यस्थितीत शेतात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. त्यामुळे वनविभागाने बछड्याला पकडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. वनविभागाने बछड्याला सोडून दिल्याने रोषही व्यक्त केला. यावर ७ ते ८ महिन्यांच्या बछड्याची आईसोबत चुकामुक झाल्याने तो पॉलिहाउसमध्ये अडकला. त्याला पकडल्यास त्याची आई मादी बिबट्याने परिसरात नागरिकांवर हल्ले केले असते. असा मुद्दा शीतल नगराळे यांनी मांडला. शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर त्यांचा रोष मावळला.