जीएमसीमध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन रखडले!

By अमित महाबळ | Published: November 13, 2023 07:07 PM2023-11-13T19:07:46+5:302023-11-13T19:08:20+5:30

कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे विद्यावेतन बाकी आहे.

In GMC, the junior resident doctor's salary has stopped | जीएमसीमध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन रखडले!

जीएमसीमध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन रखडले!

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसी) कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांचे विद्यावेतन रखडले असून, आर्थिक तरतूद पुरेशी नसल्याने प्रशासनाला पुरवणी मागणी सादर करावी लागली आहे. राज्यात केवळ जळगावच्या महाविद्यालयात हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे. जीएमसीच्या अधिष्ठातांनी मात्र, दोन महिन्याचे विद्यावेतन बाकी असल्याचे सांगितले आहे.

कनिष्ठ निवासी डॉक्टरांना विद्यावेतनासाठी एप्रिल महिन्यापासून पाठपुरावा करावा लागत आहे. नाव न छापण्याच्या अटीवर काही जणांनी सांगितले, की सुरुवातीला तीन महिन्याचे विद्यावेतन बाकी होते, त्यापैकी एक महिन्याचे देण्यात आले. त्यानंतर पुन्हा तीन महिन्याची रक्कम थकित झाली आहे. या संदर्भात वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागतो परंतु, अनुदान नसल्याने त्यांच्याकडून हतबलता व्यक्त केली जाते, असेही कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी सांगितले.

कनिष्ठ निवासी डॉक्टर दोन ते तीन वर्षापर्यंत रुग्णसेवा देतात. त्यामध्ये जेआर वन म्हटले जाणाऱ्यांना दरमहा ७२ हजार रुपये, तर जेआर टू ७५ हजार रुपये विद्यावेतन मिळते. मागील महिन्यात दसरा होता, त्यामुळे त्यांना जून महिन्याचे विद्यावेतन देण्यात आले, तर आता दिवाळी असल्याने जुलैचे विद्यावेतन देण्यात आले आहे. सद्यस्थितीत ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याची रक्कम थकित आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. दरमहा नियमितपणे विद्यावेतन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पुरवणी मागणी सादर केली
कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे विद्यावेतन बाकी आहे. जागांमध्ये वाढ झाल्याने आर्थिक तरतूद कमी पडली होती. त्यामुळे वाढीव अनुदान मिळावे म्हणून पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे. अनुदान प्राप्त होताच ते तातडीने संबंधितांना अदा केले जाईल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले.

Web Title: In GMC, the junior resident doctor's salary has stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.