जळगावात सराफ दुकान फोडून रोकड अन् दागिने लांबविले
By सुनील पाटील | Published: November 8, 2022 02:21 PM2022-11-08T14:21:04+5:302022-11-08T14:23:37+5:30
सराफ बाजारात भवानी मंदिराच्या पुढे ललीत घीसुलाल वर्मा (वय ३६,रा.गणपती नगर, जळगाव) यांच्या मालकीचे मनीष ज्वेलर्स नावाचे सराफ दुकान आहे.
जळगाव : शहरातील सराफ बाजारातील मनीष ज्वेलर्सच्या शटर्सच्या पट्ट्या व लोखंडी गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख १० हजार रुपयांचे दागिने तसेच २० हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराफ बाजारात भवानी मंदिराच्या पुढे ललीत घीसुलाल वर्मा (वय ३६,रा.गणपती नगर, जळगाव) यांच्या मालकीचे मनीष ज्वेलर्स नावाचे सराफ दुकान आहे. वडिल घीसुलाल वर्मा व भाऊ विजय हे देखील दुकानाचे कामकाज बघतात. सकाळी दहा वाजता दुकान उघडल्यानंतर रात्री साडे आठ वाजता दुकान बंद करुन तिघं जण घरी जातात. सोमवारी रात्री दुकान बंद केल्यावर सर्व जण घरी गेले. मंगळवारी सकाळी साडे सात वाजता शेजारील कमल ज्वेलर्सचे मालक कमल शर्मा यांनी ललीत यांना फोन करुन दुकान उघडे व शटरची पट्टी तुटलेली असल्याचे कळविले.
ललीत यांनी दुकानात धाव घेतली असता शटर्सच्या पट्ट्या व लोखंडी गेटचे कुलूप तुटलेले होते. सीसीटीव्हीची वायर कापण्यात आली होती व डीव्हीआर काढलेला दिसला. दुकानाच्या ड्रावरमध्ये ठेवलेली २० हजाराची रोकड तसेच ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातल्या १२ जोडी, सोन्याच्या पेंडलचे १२ नग, एक किलो चांदी त्यात विविध प्रकारचे नगर आदी ऐवज गायब झालेला होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
शनी पेठचे निरीक्षक दिलीप भागवत, सहायक निरीक्षक चव्हाण, सहायक फौजदार रवींद्र पाटील, संजय शेलार, अनिल कांबळे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपअधीक्षक संदीप गावीत यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. श्वान पथक तसेच अंगुली मुद्राच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. ललीत वर्मा यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.