जळगावात रस्त्यांच्या थर्ड पार्टी ऑडीटवरून ‘टोलवाटोलवी’
By अमित महाबळ | Published: February 24, 2023 07:09 PM2023-02-24T19:09:21+5:302023-02-24T19:09:58+5:30
जळगावात रस्त्यांच्या थर्ड पार्टी ऑडीटवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
जळगाव: महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून जळगाव शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांविषयी नागरिकांच्या तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात पाहणी करून रस्त्यांचे थर्डपार्टी ऑडीट करण्याची घोषणा केली होती. परंतु, अद्याप याचे आदेश निघालेले नाही. यामध्ये प्रशासकीय यंत्रणा टोलवाटोलवी करत असल्याचे दिसून येत आहे.
राज्य शासनाकडून जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत आहेत, तर महापालिका फंडातून १० कोटी रुपयांची कामे केली जात आहेत. परंतु, कामात दर्जा नाही, शास्त्रशुद्ध पद्धतीने रस्ते होत नसल्याचा सूर जळगावकरांमधून आहे. काही लोकप्रतिनिधींनी देखील या कामांच्या दर्जावर बोट ठेवले होते. दीड महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी केल्यानंतर थर्ट पार्टी ऑडीट करण्याची आवश्यकता व्यक्त केली होती.
अधिकारी म्हणतात...
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी या संदर्भातील पत्र महापालिकेला पाठविले असल्याचे सांगितले. मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी तीन लाखांच्या वरील कामांची देयके थर्ड पार्टी ऑडीट झाल्यावरच देण्यात येत असल्याचे सांगितले. बांधकाम विभागाचे प्रमुख व शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी कामांची देयके आल्यावर थर्ड पार्टी ऑडीट करण्याचे आदेश देण्यात येतात. ऑडीटमध्ये त्रुटी निघाल्यास तेवढी दुरुस्ती मक्तेदाराकडून करून घेतली जाते, असे सांगितले. जिल्हाधिकारी यांचे पत्र दोन दिवसापूर्वीपर्यंतच्या टपालात महापालिकेते आलेले नव्हते, असेही सोनगिरे यांनी सांगितले.