जळगावात ११ जागांवर ‘महायुती’चे उमेदवार निवडून आणणार-गिरीश महाजन
By अमित महाबळ | Updated: June 23, 2024 21:02 IST2024-06-23T21:01:56+5:302024-06-23T21:02:29+5:30
जळगाव : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून आल्या. विधानसभेच्या ...

जळगावात ११ जागांवर ‘महायुती’चे उमेदवार निवडून आणणार-गिरीश महाजन
जळगाव : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून आल्या. विधानसभेच्या निवडणुकीतदेखील सर्वच्या सर्व ११ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करू, असे आवाहन भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. ते रविवारी (दि.२३), पक्षाच्या लोकसभा समीक्षा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
समीक्षा बैठक ब्राह्मण सभेत आयोजित करण्यात आली होती. प्रदेश भाजपाने लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक जिल्ह्यातील चांगल्या गोष्टी आणि राहिलेल्या उणिवा यांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी प्रदेशकडून प्रदेश महामंत्री रणधीर सावरकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित बैठकीला उपस्थित होते.
मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले, की विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा ह्या महायुतीच्या म्हणून निवडून येतील, असा शब्द वरिष्ठांना दिला आहे. लोकसभेला महायुतीच्या नेत्यांनी साथ दिली. भाजपाच्या सोबत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी एकदिलाने काम केले. त्या धर्तीवर विधानसभेला मेहनत घ्यायची आहे, असे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिकूल परिस्थिती असताना जळगाव जिल्ह्यातून मात्र, दोन जागा निवडून आणल्याबद्दल रणधीर सावरकर यांनी कौतुक केले. राजेंद्र गावित यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या कामगिरीची स्तुती केली.
घोळ नडला, नोंदणी वाढवा
लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे यादीतून गायब होती. आता विधानसभेसाठी तयारी करा. ज्यांची नावे डिलिट झाली होती, त्यांचा समावेश करून घ्या. नवीन मतदार जोडा. त्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करा, असे आवाहन करण्यात आले.