जळगावमध्ये रोज मौजमजा, मद्याची पार्टी... अन् जुना कामगारच निघाला चोर

By सागर दुबे | Published: May 9, 2023 03:53 PM2023-05-09T15:53:01+5:302023-05-09T15:54:05+5:30

तीन तरूण काही दिवसांपासून दररोज मौजमजा करीत असून दारूवर प्रचंड खर्च करीत आहेत, अशी माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली.

In Jalgaon, every day is fun, drinking party... and the old worker turns out to be a thief | जळगावमध्ये रोज मौजमजा, मद्याची पार्टी... अन् जुना कामगारच निघाला चोर

जळगावमध्ये रोज मौजमजा, मद्याची पार्टी... अन् जुना कामगारच निघाला चोर

googlenewsNext

जळगाव : संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदून एमआयडीसी परिसरातील एच.डी.फायर कंपनीमध्ये प्रवेश करून १ लाख ४५ हजार ३०० रूपयांचा माल लांबविणा-या जुन्या कामगारासह त्याच्या दोन साथीदारांना सोमवारी रात्री कुसूंबा व सुप्रिम कॉलनी परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी त्यांना न्यायाधीश जे.एस.केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता, १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मंगळवार, दि. २ मे रोजी मध्यरात्री एमआयडीसी येथील एच.डी.फायर कंपनीच्या संरक्षक भिंती खाली खड्डा खोदून चोरट्यांनी कंपनीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर १ लाख ३२ हजार ३०० रूपये किंमतीचे मिडल एल्बो आणि १३ हजार रूपये किंमतीचे एनगॉट ब्राँझ धातूच्या पट्टया चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मोहन कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्या दिवसापासून पोलिस चोरट्यांचा शोध घेत होते.

तिघांचे नाव निष्पन्न होतोच शोध सुरू...
एच.डी.फायर कंपनीमध्ये गेल्या दोन महिन्यांपूर्वी काम सोडून गेलेला कामगार देवानंद उर्फ देवा गोकूळ कोळी (रा. रामेश्वर कॉलनी) याने त्याचे मित्र विक्की आत्माराम कोळी (३२) व ईश्वर श्रावण महाजन (३४, दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी लागलीच तिघांचा शोध घेण्यास सुरूवात केली.

दारूवर प्रचंड खर्च...
तीन तरूण काही दिवसांपासून दररोज मौजमजा करीत असून दारूवर प्रचंड खर्च करीत आहेत, अशी माहिती एमआयडीसी पोलिसांना सोमवारी रात्री खब-याकडून मिळाल्यानंतर रात्रीच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यावेळी तिघांची चौकशी केल्यानंतर तिघांमध्ये एक चोरी करणारा जुना कामगार आणि त्याचे दोन्ही साथीदार असल्याची बाब समोर आली. कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी देवानंद हा कंपनीमध्ये कामाला असल्यामुळे त्यानेच चोरीचा प्लॅन तयार केल्याची माहिती साथीदारांनी दिली.

यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, किरण पाटील, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, ललित नारखेडे यांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: In Jalgaon, every day is fun, drinking party... and the old worker turns out to be a thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव