सुवर्णनगरीत अवतरले सोनेरी-चंदेरी राम-लखन, सीतामाता
By विजय.सैतवाल | Published: January 21, 2024 10:03 PM2024-01-21T22:03:01+5:302024-01-21T22:03:55+5:30
आकर्षक मंदिर प्रतिकृतीही ठरतेय लक्षवेधी : भेट देण्यासाठी सोने-चांदीचे शिक्के
जळगाव : अवघ्या काही तासांवर आलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अख्खे शहर भगमेमय तर झालेच असून सुवर्णनगरी जळगावात सोनेरी-चंदेरी श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण व हनुमान अवतरले आहेत.
घरात नित्य पूजनासह मित्र, नातेवाईकांना भेट देण्यासाठी श्रीराम मंदिर प्रतिकृती, लहान, मोठ्या आकारातील सोने-चांदीच्या मूर्ती, शिक्के, सुवर्ण मुलामा असलेल्या पादुका शहरातील सुवर्ण व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. दोन दिवसांपासून या सर्वच वस्तूंना मोठी मागणी वाढली असून सोमवार, २२ जानेवारीच्या मुहूर्तावर ही खरेदी आणखी वाढण्याची शक्यता आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठेची उत्कंठा शिगेला पोहचली असून यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शहरं, गावं सजू लागली आहेत. यात जळगाव शहरही पताका, मोठमोठे कटआऊट, भव्य ध्वज यांनी सजले असताना सुवर्ण पेढ्यांमध्येही या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तू उपलब्ध झाल्या आहेत.
आयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतींना मोठी पसंती वाढत असल्याने जळगावात सुवर्ण मुलामा असलेल्या मंदिराची प्रतिकृती विक्रीला आली आहे. या सोबतच चांदीपासून तयार केलेल्या श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमान यांची मूर्ती उपलब्ध करून देण्यासह सुवर्ण मुलामा असलेली व आकर्षक साज चढवलेली मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या शिवाय सुवर्ण मुलामा असलेले श्रीराम पादुका घेण्याकडेही ग्राहकांचा कल असून घरोघरी त्याचे पूजन केले जाणार आहे. या शिवाय नियमित सोने-चांदीचे शिक्के तर आहेच, मात्र या वेळी श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमान असलेल्या शिक्क्यांना जास्त पसंती दिली जात आहे.
दररोज शेकडो वस्तू ग्राहकांच्या घरी
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह सुरू झाला तेव्हापासून या वस्तू जळगावात दाखल झाल्या आहेत. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून यात मोठी उलाढाल वाढली आहे. शनिवार व रविवारी तर शेकडो ग्राहकांनी या वस्तू खरेदी केल्या. रामभक्तांचा उत्साह पाहता सोमवार, २२ जानेवारी रोजी तर यात आणखी भर पडण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तवली आहे. ५५० रुपयांपासून श्रीराम पादुका असून पाच हजार ५०० रुपये किमतीपर्यंत विविध वस्तू ग्राहक खरेदी करत आहेत. यातून दोन दिवसात लाखोंची उलाढाल झाली आहे.