जळगावात दिवसा बसतात चटके, रात्री पडते गुलाबी थंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 05:06 PM2023-10-08T17:06:35+5:302023-10-08T17:06:51+5:30
ऑक्टोबर हीट : रात्री व दिवसाच्या तापमानात १७ अंशाचा फरक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मान्सून आता जवळ-जवळ परतला असल्याने वातावरणात ऋतुमान बदलाचे संकेत आता दिसू लागले आहेत. पावसाळा संपल्याने आता हळूहळू तापमानात बदल जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाचा पारा ३६ ते ३७ अंशावर असल्याने दिवसा उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. मात्र, रात्री आता तापमानात घट होत असून, रात्रीच्या वेळेस नागरिकांना गुलाबी थंडीची चाहूल आता लागायला सुरुवात झाली आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांत रात्रीच्या तापमानात चांगलीच घट होत असून, १ ते २ ऑक्टोबरदरम्यान रात्रीचे २३ ते २४ अंश असलेले तापमान रविवारी १८ अंशावर आला होता. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पहाटे चार ते सात वाजेदरम्यान चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. दरम्यान, आगामी आठवडाभरात रात्रीच्या तापमानात आणखीन घट होऊन, पारा १६ ते १८ अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर २० ऑक्टोबरनंतर रात्रीचे तापमान १४ ते १६ पर्यंत घसरण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. अजून काही दिवस दिवसाच्या तापमानात फार काही घट होण्याची शक्यता कमी असली तरी रात्रीच्या तापमानात मात्र घट पाहायला मिळू शकते.
ऋतुमान संक्रमनाचा आरोग्यावर परिणाम
दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च, जून व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये ऋतुमान बदलत असते. सद्य:स्थितीत पावसाळा संपल्यानंतर आता हिवाळ्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे तापमानात बदल पहायला मिळत आहे. बदलत्या ऋतुमान संक्रमनाचा परिणाम आता आरोग्यावरदेखील होत आहे. दिवसा जास्त तापमान व उकाडा, रात्री मात्र अल्हाददायक गारवा दोन प्रकारच्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या बदलत्या हवामानाचा लहान मुले व ज्येष्ठांवर होत असतो, त्यामुळे बदलत्या हवामानाच्या काळात लहान मुले व ज्येष्ठांची विशेष काळजी ठेवणे गरजेचे असते. कारण, सद्य:स्थितीत दिवस व रात्रीच्या तापमानात १६ ते १७ अंशाचा फरक जाणवत आहे.
गेल्या पाच दिवसांतील रात्रीच्या तापमानात झालेली घट
दिनांक - रात्रीचे तापमान
४ ऑक्टोबर - २४ अंश
५ ऑक्टोबर - २३.६ अंश
६ ऑक्टोबर - २१ अंश
७ ऑक्टोबर - १९ अंश
८ ऑक्टोबर- १८.६ अंश