जळगावात कोळी समाजातर्फे गांधीगिरी करत काढला मोर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 08:51 PM2024-01-08T20:51:41+5:302024-01-08T20:52:09+5:30

गांधीगिरी करत अधिकाऱ्यांना फुल देऊन आंदोलन केले, तर प्रशासनाच्या विरोधातील घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले होते.

In Jalgaon, the Koli community took out a march with Gandhigiri | जळगावात कोळी समाजातर्फे गांधीगिरी करत काढला मोर्चा 

जळगावात कोळी समाजातर्फे गांधीगिरी करत काढला मोर्चा 

- भूषण श्रीखंडे

जळगाव : कोळी बांधवांना जातीचा दाखला आणि जातवैधता प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून आदिवासी कोळी समाज बांधवांचे शिवतीर्थ मैदान येथे आमरण उपोषणाला सुरू आहे. उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी गांधीगिरी करत अधिकाऱ्यांना फुल देऊन आंदोलन केले, तर प्रशासनाच्या विरोधातील घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले होते.

आदिवासी महादेव, मल्हार, ढोर, टोकरे कोळी जमातीला न्याय मिळावा, यासाठी आदिवासी कोळी समाजातर्फे शिवतीर्थ मैदान येथे कोळी समाजबांधवांकडून उपोषण सुरू आहे. पाच दिवस उलटूनदेखील प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने कोळी समाजातर्फे सोमवार, दि. ८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे गांधीगिरी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की महिनाभरापूर्वी २६ दिवस केलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री यांनी प्रमुख मागण्यांपैकी अनुसूचित टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र कागदपत्रांच्या आधारे द्यावे, असे सांगितले होते. परंतु, जिल्ह्यातील कोणत्याही प्रांत कार्यालयाकडून हे जात प्रमाणपत्र देण्यात आले नाही.

तसेच मुख्यमंत्री यांनी आदिवासी कोळी समाजातील जातीचा सखोल अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यासाठी आदेश होऊनदेखील अद्याप समिती गठीत झालेली नाही. त्यामुळे महादेव, मल्हार, ढोर, टोकरे कोळी जमातीला प्रमाणपत्र देऊन आदिवासी कोळी समाजाला न्याय द्यावा, तसेच आदिवासी विकास विभागातील घोटाळ्याची तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना प्रा. भाऊसाहेब सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, पंकज सपकाळे, संदीप कोळी, मंगला सोनवणे, संजय सोनवणे, हिरालाल सोनवणे, प्रवीण सपकाळे, कृष्णा सपकाळे आदी समाजबांधव उपस्थित होते.

चॉकलेट देण्याचा प्रयत्न
मागील महिन्यात आंदोलन केल्यानंतर कोळी समाजाला आश्वासन दिल्यानंतर ही प्रशासनाकडून त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे कोळी समाजातर्फे आंदोलनप्रसंगी जिल्हाधिकारी यांना चॉकलेट देण्यात येणार होते. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांकडून चॉकलेट जप्त करून हा प्रयत्न हाणून पाडला.

Web Title: In Jalgaon, the Koli community took out a march with Gandhigiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.